बातम्या
सांगलीतील प्रीतम आनंद वृद्धाश्रमाला संजय घोडावत फौंडेशनची दरमहा आर्थिक मदत
By Administrator - 11/26/2026 2:33:37 PM
Share This News:
प्रीतम आनंद वृद्धाश्रमाला संजय घोडावत फौंडेशनचा मदतीचा हात; दरमहा आर्थिक सहाय्य देणार
जयसिंगपूर/ प्रतिनिधी - उमेश पाटील
सांगली येथील प्रीतम आनंद वृद्धाश्रमाच्या पायाभूत सुविधा आणि दैनंदिन खर्चासाठी संजय घोडावत फौंडेशनच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे. ही मदत दरमहा करण्यात येणार असून, वृद्धाश्रमाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांनी दिले.
प्रीतम आनंद वृद्धाश्रमाचे उद्घाटन संजय घोडावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त विनायक भोसले, विजयाताई पृथ्वीराज पाटील आणि अध्यक्ष अभिनय कामाजी उपस्थित होते.
समाजातील कोणताही ज्येष्ठ नागरिक एकटेपणामुळे निराश किंवा हताश होऊ नये, तसेच प्रत्येक आजी-आजोबांना आपलेपणा, आपुलकी, प्रेम आणि आत्मसन्मान मिळावा, या उद्देशाने संस्था कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष अभिनय कामाजी यांनी सांगितले.
वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासह मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी यांसारखे बैठे खेळ, चित्रकला, हस्तकला, विणकाम, तबला, गिटार, हार्मोनियम, पियानो आणि बासरी यांसारख्या कलात्मक उपक्रमांचा समावेश आहे. तसेच संगणक, लॅपटॉप, पोहण्यासाठी तलाव आणि धार्मिक वाचनासाठी स्वतंत्र सभागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वृद्धाश्रमाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार
प्रीतम आनंद वृद्धाश्रमासाठी आवश्यक असणारी सर्व मदत संजय घोडावत फौंडेशनच्या माध्यमातून केली जाईल, असे आश्वासन संजय घोडावत यांनी दिले. सामाजिक बांधिलकी जपत फौंडेशनच्या वतीने कोल्हापुरातील माउली केअर सेंटर, मिरज येथील अंधशाळा आदी संस्थांना दरमहा आर्थिक मदत केली जाते. विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच कोल्हापुरातील लोटस केअर सेंटरमधील एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या औषधोपचारासाठीही मदत केली जाते.
दरम्यान, प्रीतम आनंदशाळेच्या परिसरात इनडोअर स्टेडियमची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी स्पोर्ट्स अकादमी सुरू करून देशभरातील नामवंत क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही संजय घोडावत यांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक मदत आणि सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष अभिनय कामाजी यांनी संजय घोडावत फौंडेशन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
सांगलीतील प्रीतम आनंद वृद्धाश्रमाला संजय घोडावत फौंडेशनची दरमहा आर्थिक मदत
|