बातम्या

गोकुळला २८० कोटींचा आर्थिक भार; पशुखाद्य विभागाला १६ कोटींचा तोटा

gokul dairy 280 crore financial burden kolhapur


By Administrator - 11/19/2026 3:19:22 PM
Share This News:



गोकुळला २८० कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार; १६ कोटींचा पशुखाद्य विभागाला तोटा, जबाबदार कोण?

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या आर्थिक स्थितीवरून नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. संघावर २८० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचे प्रशासक मंडळाने जाहीर केले आहे. तसेच पशुखाद्य विभागालाही १६ कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे गोकुळच्या या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल दूध उत्पादकांकडून उपस्थित होण्याची गरज आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने दूध खरेदी दरात वाढ केली; मात्र विक्री दरात वाढ न केल्याने संघावर अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचे प्रशासकांनी सांगितले. दुसरीकडे, प्रशासकांच्या कार्यकाळातही हा भार वेळीच कमी करण्यासाठी विक्री दरात वाढ का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पशुखाद्य विभागाच्या १६ कोटींच्या तोट्याबाबतही स्पष्टीकरणाची गरज आहे. कच्च्या मालाच्या किमतीत ३५ ते ४० टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत असताना पशुखाद्याच्या दरात योग्य वेळी वाढ करून तोटा कमी करता आला असता, अशी चर्चा आहे.

गोकुळच्या प्रत्येक विभागात प्रमुख अधिकारी असताना खरेदी प्रक्रियेतील आर्थिक परिणामांचा अंदाज का घेतला गेला नाही? तोटा होण्याची शक्यता प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिली होती का? अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. सत्तेसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांनी आता गोकुळच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा दूध उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.


गोकुळला २८० कोटींचा आर्थिक भार; पशुखाद्य विभागाला १६ कोटींचा तोटा
Total Views: 14