राजकीय
गोकूळ निवडणुकीत भाजपने संयम दाखवावा राष्ट्रवादीचा इशारा
By nisha patil - 6/30/2026 5:11:22 PM
Share This News:
कोल्हापूर : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संयम, समंजसपणा आणि मोठेपणा दाखवावा, असे आवाहन केले आहे.
भाजपच्या अलीकडील शक्तीप्रदर्शन सभेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेली वक्तव्ये महायुतीमध्ये मतभेद निर्माण करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली ठरावधारकांची आकडेवारी पूर्णतः वस्तुनिष्ठ असल्याचा दावा करत, विविध नेत्यांच्या भूमिकांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले. काही नेते युतीतीलच असल्याने त्यांच्याबाबत गैरसमज पसरवू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अवसायनातील ठरावांमुळे महायुतीलाच फटका बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच विभागीय सहकार उपनिबंधकांच्या ४२७ संस्थांच्या सभासदत्व रद्द करण्याच्या आदेशाचा निवडणुकीवर परिणाम होईल, असे सांगत तो निर्णय मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवडणूक प्रक्रियेत सर्व घटक पक्षांनी एकदिलाने व संयमाने काम करावे, अन्यथा त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
गोकूळ निवडणुकीत भाजपने संयम व मोठेपणा दाखवावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचे आवाहन
|