राजकीय
गोकुळ निवडणुकीत शाहू समविचारी आघाडीची जोरदार एन्ट्री आज ठराव दाखल
By nisha patil - 6/30/2026 1:10:06 PM
Share This News:
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजश्री छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आज (३० जून) जिल्ह्यात जिल्हाभरातील सभासद संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मोठ्या शक्तीप्रदर्शनासह दाखल करण्यात येणार आहेत. गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात असून, जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.
विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडणार असून, सकाळी ११ वाजता ताराबाई पार्क येथील धैयप्रसाद हॉल येथे सभासद संस्था प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सर्व प्रतिनिधी एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ठराव दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या निवडणुकांपैकी एक मानली जाते. त्यामुळे विविध राजकीय गटांकडून जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारी निश्चित करण्यापासून ते सभासद संस्थांचे पाठबळ मिळविण्यापर्यंत सर्वच स्तरांवर हालचालींना वेग आला आहे.
राजश्री छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शक्तीप्रदर्शनातून निवडणुकीतील आपली संघटनात्मक ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमानंतर गोकुळ निवडणुकीच्या प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत इतर प्रमुख गटांकडूनही अशाच प्रकारचे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीत यंदा विविध राजकीय आणि सहकारी गटांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित असून, ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेपासूनच निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम गोकुळ निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सतेज पाटील गटाचे शक्तीप्रदर्शन आज ठराव दाखल होणार
|