राजकीय

गोकुळमध्ये ४६ सेवानिवृत्त कर्मचारी आणि १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

gokul retired employees meritorious students felicitation kolhapur


By nisha patil - 1/7/2026 3:12:48 PM
Share This News:



कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटना, आयटक आणि कॉ. अवि पानसरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळमधील ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कर्मचारी वर्गातील दहावी-बारावी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

गोकुळच्या शिरगाव येथील प्रधान कार्यालयातील कुरिअर हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात श्रमिक मुक्ती दलाचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गोकुळच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर तसेच कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना कॉ. डॉ. भारत पाटणकर यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. गोकुळसारख्या सहकारी संस्थेत सेवा करण्याची संधी हे कर्मचाऱ्यांचे भाग्य असल्याचे सांगत त्यांनी कोल्हापूरच्या सहकार परंपरेचे कौतुक केले.

ते म्हणाले की, "सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे." सेवाकाळात मिळालेला अनुभव समाज, शेती आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच गोकुळने दरवर्षी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करावा, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा लाभ नव्या पिढीला मिळेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या सेवाकाळातील अनुभव लेखी स्वरूपात जतन करावेत. त्यातून भावी पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रकांत परूळेकर यांनी दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा मालक असल्याचे सांगत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायात उतरून दूध उत्पादक म्हणून गोकुळच्या दूध संकलन वाढीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कष्टाच्या बळावर उभारलेल्या कार्याचा आदर्श नव्या कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कर्मचारी वर्गातील १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाल, श्रीफळ, कृषी उत्पादने आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ भाकपचे कामगार नेते कॉ. दिलीप पवार, आयटकचे अध्यक्ष कॉ. एस. बी. पाटील, गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, डॉ. व्ही. डी. पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. मल्हार पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, जनरल सेक्रेटरी कॉ. सदाशिव निकम यांच्यासह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


गोकुळमध्ये ४६ सेवानिवृत्त कर्मचारी व १९ विद्यार्थ्यांचा सत्कार
Total Views: 13