कृषी
गोकुळ श्री स्पर्धा २०२६; म्हशीला ३५ हजार, गायीला २५ हजारांचे बक्षीस
By Administrator - 2/11/2026 5:48:42 PM
Share This News:
गोकुळतर्फे ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; म्हैशीला ३५ हजार, तर गायीला २५ हजारांचे पहिले बक्षीस!
कोल्हापूर :
दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अधिक दूध उत्पादन करणाऱ्या पशुपालकांचा सन्मान करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने यंदाही प्रतिष्ठेच्या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी केले आहे.
दूध उत्पादन वाढीस चालना मिळावी आणि उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव व्हावा, या उद्देशाने गोकुळतर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन किंवा सचिव यांच्या सही व शिक्क्यानिशी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेंबर २०२६ असून, बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ आणि ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयांमध्ये नोंदणी करता येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या म्हशीने प्रतिदिन किमान १२ लिटर, तर गायीने किमान २० लिटर दूध देणे आवश्यक आहे. स्पर्धेतील म्हैस आणि गाय या दोन्ही गटांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात येणार आहेत.
अशी आहेत आकर्षक बक्षिसे!
म्हैस गटातील प्रथम क्रमांकाला ३५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ३० हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला २५ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. गाय गटात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. विजेत्यांना रोख रकमेबरोबरच शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अटी व नियमांची सविस्तर माहिती गोकुळच्या प्राथमिक दूध संस्थांना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. अधिक दूध उत्पादन करणाऱ्या पशुपालकांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुळच्या वतीने करण्यात आले आहे.
गोकुळ श्री स्पर्धा २०२६; म्हशीला ३५ हजार, गायीला २५ हजारांचे बक्षीस
|