बातम्या

पं. उल्हास कशाळकर, कृष्णा साळुंखे यांना पहिला गुणीदास पुरस्कार २०२६

gunidas award 2026 ulhas kashalkar krishna salunkhe kolhapur


By Administrator - 11/18/2026 12:20:44 PM
Share This News:



ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर आणि युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांना पहिला ‘गुणीदास पुरस्कार २०२६’ जाहीर!

६ डिसेंबरला केशवराव भोसले नाट्यगृहात पुरस्कार वितरण; तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर - 

कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या १७ वर्षांपासून साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीदास फाऊंडेशनच्या वतीने यंदापासून ‘गुणीदास पुरस्कार’ सुरू करण्यात येत आहे. या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर आणि युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. पं. उल्हास कशाळकर यांना ‘गुणीदास कलासाधक पुरस्कार’, तर कृष्णा साळुंखे यांना ‘गुणीदास नवोन्मेष पुरस्कार’ जाहीर झाला आहे. फाऊंडेशनचे सेक्रेटरी डॉ. अजित शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुरस्कार वितरण सोहळा आणि विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवार, ६ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे होणार आहे. या सोहळ्याला करवीर पीठाचे श्रीमद् जगद्गुरू सच्चिदानंद शंकराचार्य विद्यानृसिंह भारती आणि ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

पं. उल्हास कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक असून ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तीन घराण्यांच्या गायकीचा सुरेख संगम त्यांच्या गायनशैलीत पाहायला मिळतो. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार आणि तानसेन सन्मान अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नुकतीच त्यांना आयटीएम विद्यापीठ, ग्वाल्हेर यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे हे तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य असून मृदंगाचार्य पं. नानासाहेब पानसे यांच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. पारंपरिक पखवाज वादनाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी ‘पखवाज शिवतांडव’ या अभिनव सादरीकरणातून देश-विदेशातील रसिकांची मने जिंकली आहेत. तसेच ‘कृष्णनाद पखवाज गुरुकुल’च्या माध्यमातून ते नव्या पिढीला पखवाज वादनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत.

या पुरस्कार सोहळ्यानिमित्त विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृष्णा साळुंखे आणि त्यांचा शिष्य परिवार मृदंग कीर्तन सादर करणार आहेत. त्यांना गायनात सूरंजन खंडाळकर, तर हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी साथ देणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर पं. उल्हास कशाळकर यांचे बहारदार शास्त्रीय गायन होणार असून त्यांना तबल्यावर तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी यांची साथ लाभणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असून कोल्हापूरकर संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन गुणीदास फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुस्मिता शिरीष सप्रे, राजप्रसाद धर्माधिकारी आणि पुरस्कार निवड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला डॉ. अजित शुक्ल, राजप्रसाद धर्माधिकारी, अरविंद लाटकर, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, अभय देशपांडे, दर्शन शिरपूरकर, सुधर्म जामसांडेकर, गौरी केसकर, प्रणव मोघे आदी उपस्थित होते.


पं. उल्हास कशाळकर, कृष्णा साळुंखे यांना पहिला गुणीदास पुरस्कार २०२६
Total Views: 19