राजकीय
कोयनेचे पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण हक्काच्या पाण्याला धक्का नको -हसन मुश्रीफ
By Administrator - 11/24/2026 3:48:48 PM
Share This News:
कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्यास विरोध नाही; मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागू देणार नाही - मंत्री मुश्रीफ
कोल्हापूर :
कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर कोकणात वाहून जाणारे पाणी मुंबईला वळवण्याचा शासनाचा विचार असेल, तर त्याला आपला विरोध नाही. मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याला कोणताही धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली. सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याबाबत केलेल्या विधानावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, वीजनिर्मितीनंतर कोकणात जाणारे पाणी मुंबईला मिळणार असेल, तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी सुरक्षित राहिले पाहिजे.
दरम्यान, मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी पुराचे समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवण्याची योजना महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहित पवारांच्या आंदोलनावर भाष्य टाळले
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांबाबत बोलताना हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीबाबत पक्षातील कार्यकर्त्यांच्या काही तक्रारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोकुळचा विषय संपला, आता विकासावर लक्ष
गोकुळ दूध संघातील वादावर बोलताना मुश्रीफ यांनी हा विषय आता संपवून संघाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असे आवाहन केले. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी गायीच्या दुधाला दोन रुपये आणि म्हशीच्या दुधाला तीन रुपये प्रतिलिटर दरवाढ देण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. गोकुळसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणात अंतिम निर्णय न्यायदेवता घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोयनेचे पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण हक्काच्या पाण्याला धक्का नको - हसन मुश्रीफ
|