बातम्या

इचलकरंजी एसटी स्टँडवर सोन्याचे गंठण चोरी; रेकॉर्डवरील महिलेला अटक

ichalkaranji st stand gold chain theft woman arrested


By nisha patil - 11/18/2026 3:11:38 PM
Share This News:



इचलकरंजी एसटी स्टँडवर महिलेच्या पर्समधून सोन्याचे गंठण चोरी; रेकॉर्डवरील महिलेला अटक, ५.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी :

एसटी स्टँडवरील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून सोन्याचे गंठण चोरणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. सपना वैभव कदम (वय ३२, रा. कुपवाड, जि. सांगली) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, तिच्याकडून ५ लाख ८२ हजार ९६६ रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे.

१३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास इचलकरंजी एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी असताना एका महिलेच्या पर्समधून सुमारे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरीला गेले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तारदाळ फाटा येथे सापळा रचून सपना कदम हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तिच्याकडून ४१.९४० ग्रॅम वजनाचे आणि ५ लाख ८२ हजार ९६६ रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

अटक केलेल्या सपना कदम हिला जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



इचलकरंजी एसटी स्टँडवर सोन्याचे गंठण चोरी; रेकॉर्डवरील महिलेला अटक
Total Views: 7