राजकीय
इचलकरंजीत पुढील दोन वर्षांत १० हजार ऑटोलूम येणार; ‘मला दिल्लीला पाठवा’, माजी आ. प्रकाश आवाडेंचे आवाहन!
By Shivani - 8/24/2026 3:12:02 PM
Share This News:
इचलकरंजीत पुढील दोन वर्षांत १० हजार ऑटोलूम येणार; माजी आ. प्रकाश आवाडेंचे मोठे वक्तव्य, ‘मला दिल्लीला पाठवा’
इचलकरंजी :
वस्त्रोद्योगाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या इचलकरंजीत पुढील दोन वर्षांत तब्बल १० हजार ऑटोलूम येणार असल्याची माहिती माजी आ. प्रकाश आवाडे यांनी दिली. एका ऑटोलूमची किंमत तब्बल ४० लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगत, या यंत्रसामग्रीसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्ड्स असोसिएशनच्या ७८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आ. प्रकाश आवाडे बोलत होते. यावेळी त्यांनी वस्त्रोद्योगाच्या भविष्यासह कामगारांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
कामगारांसाठी घरकुल योजना, कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा
इचलकरंजीत येणाऱ्या नव्या ऑटोलूम उद्योगासाठी आवश्यक कामगार तयार करण्याचे काम सुरू असल्याचे माजी आ. आवाडे म्हणाले. महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम केले जात आहे. तसेच कामगारांना राहण्यासाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून, त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना लागू करण्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी यंत्रमाग उद्योगासाठी २३ कलमी योजना आणल्याचा उल्लेख करत माजी आ.आवाडे म्हणाले की, भविष्यात आवश्यकता भासल्यास वस्त्रोद्योगासाठी पुन्हा अशाच प्रकारची योजना आणली जाईल.
‘मला दिल्लीला पाठवा’; खासदारकीच्या इच्छेचे संकेत
या सभेत प्रकाश माजी आ. आवाडे यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त केली. ‘प्रसंग पडला तर पुन्हा एकदा वस्त्रोद्योगासाठी अशाप्रकारची योजना आणली जाईल. त्यासाठी मला दिल्लीला पाठवा,’ असे आवाहन त्यांनी उपस्थित यंत्रमागधारकांना केले.
माजी आ. आवाडे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित यंत्रमागधारकांनी हात उंचावत त्यांना प्रतिसाद दिला. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या खासदारकीच्या उमेदवारीच्या चर्चेला पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.
‘पाच वर्षे थांबा, देशातील लोक इचलकरंजीचा वस्त्रोद्योग पाहण्यासाठी येतील’
इचलकरंजीला एक्स्पोर्ट सिटी बनवण्याचा निर्धारही माजी आ. प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, आपण थांबणार नाही. पाच वर्षे थांबा, देशातील लोक वस्त्रोद्योग पाहण्यासाठी इचलकरंजीला येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘वस्त्रोद्योगात मंदी नाही, विविध प्रकारच्या कापड निर्मितीवर भर द्या’
वस्त्रोद्योगात सध्या मंदी नसून प्रोसेस बंद असल्यामुळे काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे माजी आ.आवाडे यांनी सांगितले. या परिस्थितीतून मार्ग काढला जात असल्याने यंत्रमागधारकांनी हवालदिल होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
कापड निर्मिती करताना विविध प्रकारच्या व्हरायटी तयार करण्यावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. चांगल्या दर्जाच्या कापडाला सध्या मागणी असून अनेक उद्योजकांकडे पुढील पाच-सहा महिन्यांचे बुकिंग असल्याचे त्यांनी सांगितले. काही उद्योजकांकडे वर्षभराच्या ऑर्डर्स असल्याचाही दावा त्यांनी केला.
‘रडत बसायचे नाही, आता ब्रँडिंगमध्ये उतरा’
वस्त्रोद्योगातील नव्या पिढीने आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज असल्याचे माजी आ. आवाडे म्हणाले. ‘आता रडत बसायचे नाही, आता ब्रँडिंगमध्ये उतरण्याची तयारी ठेवा. आपले भांडवल आपल्याकडे ठेवा,’ असे आवाहन त्यांनी यंत्रमागधारकांना केले.
इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ, ब्रँडिंग आणि निर्यातीची जोड देऊन शहराला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
इचलकरंजीत १० हजार ऑटोलूम येणार; माजी आ. प्रकाश आवाडेंचे मोठे वक्तव्य
|