बातम्या
गवसे उपकेंद्र येथे 11के. व्ही. हरपवडे सोलर वाहिनीचा लोकार्पण सोहळा संपन्न
By nisha patil - 9/26/2025 11:20:40 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार ) :- 33/11 के.व्ही. गवसे उपकेंद्र येथे 11 के. व्ही. हरपवडे सोलर वाहिनीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. भारतातील 2458 मेगावॉट क्षमतेच्या एकूण 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे लोकार्पण पंत प्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणविस यांच्या शुभ हस्ते पार पडले.
हरपवडे ग्रामपंचायत हद्दीत 4 मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे, सदरच्या सौर प्रकल्पामुळे 33/11 के.व्ही.गवसे उपकेंद्रामधून विद्युत पुरवठा होणार्या गवसे पंचक्रोशीतील 1025 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा देणे शक्य होणार आहे. सदर आयोजित कार्यक्रम हा कार्यकारी अभियंता,गडहिंग्लज विभाग संजय पोवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तसेच सदर कार्यक्रमास अधीक्षक अभियंता,कोल्हापुर मंडळ गणपती लटपटे ,मुख्य अभियंता,कोल्हापुर परिमंडळ स्वप्निल काटकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
या सोहोळ्याप्रसंगी उपस्थित सरपंच ग्रामपंचायत हरपवडे सागर पाटील यांचा सदर महत्वकांक्षी प्रकल्पास जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच नवीन वाहिनीचे उद्घाटन कार्यकारी अभियंता पोवार यांच्यासह सरपंच ग्रामपंचायत हरपवडे सागर पाटील,गोविंद गुरव(माजी सरपंच ग्रामपंचायत हरपवडे), मुकुंद तानवडे , डॉ. धनाजी राणे ,आदी ग्रामपंचायत सरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दिवसा शेतीस विद्युत पुरवठा उपलब्ध होणार असल्याने उपस्थितानी तसेच शेतकरी यांनी आनंद व्यक्त करून महावितरणचे मनोगतातून आभार व्यक्त केले.सदर प्रकल्पाचे काम हे मे. एम. एस.के. व्ही.वाय. थर्ड सोलर एस. पी.व्ही. लि. मुंबई यांनी यशस्वी रित्या पार पाडले आहे. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उप.कार्यकारी अभियंता,उप विभाग आजरा,आजरा उपविभागातील सर्व सहाय्यक अभियंता,सर्व जनमित्र,कर्मचारी,सदर प्रकल्पाचे प्रतिनिधी व बहुसंख्य लाभार्थी शेतकरी सदर सोहळ्यास उपस्थित होते.
आज पर्यंत गडहिंग्लज विभागांतर्गत अनुक्रमे माणगाव, हरळी, दुंडगे व हरपवडे असे एकूण 18 मेगावॉट क्षमतेचे 04 सौर विद्युत प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत तर अजून विभागअंतर्गत एकूण 28 मेगावॉट क्षमतेचे 13 सौर विद्युत प्रकल्पांचे काम प्रगती पथावर आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
गवसे उपकेंद्र येथे 11के. व्ही. हरपवडे सोलर वाहिनीचा लोकार्पण सोहळा संपन्न
|