बातम्या

खराडी पोलिस शिपायावर 300 रुपये घेतल्याचा आरोप; आकाश मुळे निलंबित

kharadi police constable akash mule suspended pune


By Shivani - 3/9/2026 11:32:29 AM
Share This News:



खराडी पोलिस शिपायावर 300 रुपये घेतल्याचा आरोप; आकाश मुळे निलंबित

पुणे :

अनधिकृत आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या खराडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायावर पानटपरी चालकाकडून पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस शिपाई क्रमांक ८५६७ आकाश अरुण मुळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश मुळे हे खराडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांची झेनसार रोड परिसरात ड्युटी नेमण्यात आली होती. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या अनधिकृत आस्थापनांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

या दरम्यान झेनसार आयटी पार्कसमोरील के.एन. स्मोक व्हॅली या पान शॉपवर मुळे यांनी कारवाई केली. संबंधित आस्थापना चालक कुमार नारायणकर यांच्या लेखी जबाबानुसार, १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.१० वाजता ते दुकानात सिगारेट विकत असताना मुळे तेथे आले. त्यांनी सिगारेट विक्री केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित साहित्य पिशवीत घेऊन चालक निघत असताना पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

नारायणकर यांच्या जबाबानुसार, मुळे यांनी दरमहा ५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यावेळी नारायणकर यांनी सध्या ३०० रुपये देतो आणि उर्वरित २०० रुपये नंतर देतो, असे सांगितले. त्यानंतर मुळे यांनी ३०० रुपये स्वीकारल्याचे जबाबात नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्रपाळी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे यांनी संबंधित पान शॉप चालकाला खराडी पोलीस ठाण्यात बोलावून त्याची माहिती घेतली. त्यानंतर त्याचा लेखी जबाब नोंदविण्यात आला.

निलंबन आदेशानुसार, अनधिकृत आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना संबंधित पोलीस शिपायाने कारवाई न करता आस्थापना चालकाकडे पैशांची मागणी करून ते स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे शासकीय कर्तव्य बजावताना गैरवर्तन केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील विभागीय चौकशीत आरोपांबाबत अंतिम निर्णय होणार आहे.


खराडी पोलिस शिपाई आकाश मुळे निलंबित; पानटपरी चालकाकडून पैसे घेतल्याचा आरोप
Total Views: 28