कृषी
खुपिरेतील शक्तीपीठ महामार्गविरोधी सभा रद्द; ग्रामस्थांचा मोठा निर्णय
By Shivani - 3/9/2026 1:41:53 PM
Share This News:
खुपिरेतील शक्तीपीठ महामार्गविरोधी सभा रद्द; ग्रामस्थांचा निर्णय, वाद टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील खुपिरे येथे आज, ३ सप्टेंबर २०२६ रोजी होणारी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील सभा रद्द करण्यात आली आहे. गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच ग्रामस्थांमध्ये कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
खुपिरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती यांच्या वतीने विरोध सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीत काही ग्रामस्थांनी या सभेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रस्तावित महामार्गात जात नाही, त्यांनी आंदोलन पुढे नेऊ नये आणि ग्रामस्थांना आपल्या भूमिकेत धरू नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
गावाच्या नावावर बाहेरून राजकारण नको
खुपिरे गावातील ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहत असून, बाहेरून कोणी येऊन गावाच्या नावावर राजकारण करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या समन्वयकांना बैठकीत देण्यात आला.
तसेच, आमदार राजेश क्षीरसागर हे शेतकरी आणि राज्य शासन यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या विरोधात कोणतीही वक्तव्ये करू नयेत, अशी सूचना करण्यात आली. अन्यथा सभा उधळून लावण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांना भूमिकेचे स्वातंत्र्य
ज्या शेतकऱ्याला स्वखुशीने आपली शेती शक्तीपीठ महामार्गासाठी द्यायची असेल, त्याच्यावर कोणताही दबाव आणू नये, अशी स्पष्ट भूमिका बैठकीत घेण्यात आली. संबंधित शेतकऱ्याचा महामार्गाला समर्थन असो किंवा विरोध, आपली भूमिका मांडण्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असावे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
महामार्ग विरोधी संघर्ष समितीने गावकऱ्यांची संमती न घेता अथवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता कोणतीही भूमिका घेऊ नये, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली.
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सभा रद्द
या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर गावात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३ सप्टेंबर रोजीची शक्तीपीठ महामार्गविरोधी सभा रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीस पैलवान दाजी पाटील, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन युवराज पाटील, वीर हनुमान दूध संस्थेचे चेअरमन सरदार पाटील, सतीश जाधव, शिवाजी जाधव, ओंकार पाटील, शुभम पाटील, सुरज जाधव, संदीप जाधव, सागर पाटील, शेतकरी संघटनेचे पांडुरंग शिंदे, संताजी पाटील, गवळी यांच्यासह खुपिरे, साबळेवाडी आणि शिंदेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
खुपिरेतील शक्तीपीठ महामार्गविरोधी सभा रद्द; ग्रामस्थांचा मोठा निर्णय | Kolhapur News
|