शैक्षणिक
४७ विद्यार्थिनींच्या केएमटी प्रवासाचा मार्ग मोकळा! परिवहन समितीची अखेर मंजुरी; सत्यजित जाधव यांचा सकारात्मक निर्णय
By Administrator - 10/31/2026 5:36:27 PM
Share This News:
केएमसी महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींच्या केएमटी पासचा प्रश्न अखेर मार्गी; वापरास परिवहन समितीची मंजुरी!
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींना मंजूर करण्यात आलेल्या केएमटी सवलत पासच्या वापराचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. परिवहन समितीने या पासच्या वापरास सकारात्मक भूमिका घेत मंजुरी दिली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थिनींना आता केएमटी बसमधून सवलतीच्या पासवर प्रवास करता येणार असून, त्यांचे संभाव्य शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान टळणार आहे. अशी माहिती परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी दिली.
महिला व बालकल्याण समितीच्या ठरावानुसार के.एम.सी. महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी ४७ केएमटी सवलत पास तयार करण्यात आले होते. मात्र, या योजनेला परिवहन समितीची अंतिम मान्यता मिळाली नसल्याने ३० ऑक्टोबर रोजी परिवहन उपक्रमाने महाविद्यालयाला पत्र पाठवून मान्यता मिळेपर्यंत पासचा वापर करू नये, असे कळविले होते. त्यामुळे विद्यार्थिनींच्या मोफत प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला होता.
या प्रकारानंतर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि परिवहन विभागातील समन्वयाचा अभाव तसेच परिवहन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, या प्रशासकीय मतभेदांचा फटका विद्यार्थिनींना बसू नये, यासाठी परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांनी पुढाकार घेतला.
जाधव यांनी परिवहन समितीच्या सदस्यांशी चर्चा करून विद्यार्थिनींचे हित लक्षात घेण्याचे आवाहन केले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही या प्रकरणी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करून माफी मागितल्याची बाब विचारात घेण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय वाद न वाढविता सामंजस्याची भूमिका घेत ४७ सवलत पास वापरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणे किंवा त्यांच्यावर आर्थिक भार पडणे योग्य नाही. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय बाबींवर मतभेद असू शकतात; मात्र त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होता कामा नये. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परिवहन समितीने सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित सवलत पास वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. भविष्यात अशा योजना राबविताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करणे आवश्यक आहे.
परिवहन समितीच्या या निर्णयामुळे के.एम.सी. महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींच्या प्रवासाचा प्रश्न सुटला आहे. प्रशासकीय मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याने विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
४७ विद्यार्थिनींच्या केएमटी प्रवासाचा मार्ग मोकळा! परिवहन समितीची अखेर मंजुरी; सत्यजित जाधव यांचा सकारात्मक निर्णय
|