ताज्या बातम्या
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण; 29 जुलैपर्यंत EF फॉर्म भरण्याचे आवाहन
By Shivani - 10/7/2026 5:36:39 PM
Share This News:
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण; 29 जुलैपर्यंत गणना फॉर्म भरण्याचे आवाहन
कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २७४-कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) सुरू झाले असून, संपूर्ण मतदार यादी नव्याने तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने गणना फॉर्म (Enumeration Form - EF) मुदतीत भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या मतदार याद्या रद्द करून नव्याने मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मतदारसंघातील ३५४ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO) ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरभेटी देत सर्व ३ लाख ७९ हजार ३४७ मतदारांना गणना फॉर्मचे वितरण करण्यात आले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्यांनी अद्याप गणना फॉर्म भरलेला नाही त्यांनी पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, २००२ मधील मतदार यादीतील तपशील तसेच आवश्यक असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नाव बदलाबाबतचे गॅझेट आदी कागदपत्रांसह फॉर्म भरून BLO कडे जमा करावेत.
बाहेरगावी असलेल्या मतदारांनीही मुदतीत फॉर्म भरून देणे आवश्यक असून, गणना फॉर्म सादर करण्याची जबाबदारी संबंधित मतदारांचीच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदारांना मदत करण्यासाठी करवीर तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. तसेच voters.eci.gov.in या संकेतस्थळावरही मतदारांना आपला तपशील शोधून गणना फॉर्म भरण्यास मदत मिळणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्यामध्ये केवळ गणना फॉर्म प्राप्त झालेल्या मतदारांचीच नावे समाविष्ट केली जातील. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. सुनावणीनंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तसेच मृत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा आढळून न आलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, अशा मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Special Intensive Revision (SIR)
|