शैक्षणिक
कोल्हापूरच्या 150 शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती; 7R संकल्पनेचे धडे
By Shivani - 11/9/2026 5:58:06 PM
Share This News:
कोल्हापूरच्या 150 शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची जनजागृती; विद्यार्थ्यांना 7R संकल्पनेचे धडे
खेळ, प्रश्नोत्तरे आणि प्रात्यक्षिकांतून कचरा वर्गीकरण, पुनर्वापर व पर्यावरण संवर्धनाचे मार्गदर्शन
कोल्हापूर :
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सुमारे 150 शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती कार्यशाळा राबविण्यात येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच कचरा वर्गीकरण, कचरा कमी करणे, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाच्या सवयी रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती (IEC) या घटकांतर्गत हा उपक्रम सुरू आहे. शाळा तसेच विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना कचरा कसा निर्माण होतो, परिसरातील कचऱ्याचे निरीक्षण कसे करावे, कचऱ्यामुळे पर्यावरण व आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध खेळ, प्रश्नोत्तरे आणि मनोरंजक उपक्रमांचा वापर केला जात आहे.
यावेळी ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी वेस्ट यांचे योग्य वर्गीकरण कसे करावे, तसेच कोणत्या वस्तू कचऱ्यात टाकाव्यात आणि कोणत्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
‘7R’ संकल्पनेतून कचरा कमी करण्याचा संदेश
विद्यार्थ्यांना Refuse, Reduce, Reuse, Repurpose, Rethink, Recycle आणि Repair या ‘7R’ संकल्पनेची माहिती देण्यात येत आहे. दैनंदिन जीवनात कचरा कमी करण्यासोबतच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे.
तसेच स्टीलच्या डब्याचा प्रवास आणि प्लास्टिकच्या डब्याचा प्रवास या माध्यमातून वस्तूंच्या वापरापासून त्यांच्या विल्हेवाटीपर्यंत होणारा पर्यावरणीय परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितला जात आहे.
शाळांमध्ये ‘रिसायकल कॉर्नर’
घनकचरा व्यवस्थापनाची संकल्पना शालेय स्तरावर रुजविण्यासाठी सहभागी शाळांमध्ये ‘रिसायकल कॉर्नर’ उभारण्यात आले आहेत. पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करता येणाऱ्या वस्तूंबाबत विद्यार्थ्यांना या माध्यमातून माहिती दिली जात आहे.
शाळांना वार्षिक कॅलेंडरही देण्यात आले असून त्यामध्ये वर्षभर आठवड्यानुसार विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी या उपक्रमांचा नियमित अवलंब करावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
कार्यशाळेच्या समारोपावेळी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आवश्यक साहित्य देण्यात येते. तसेच कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल शाळांना स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे.
या जनजागृती कार्यशाळांमध्ये संघनंद कांबळे, मानसी बोलुरे, ओंकार शिंगटे आणि रोहित कांबळे हे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शहर समन्वयक मेघराज चडचणकर आणि आरोग्य निरीक्षक भूमी कदम यांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरण, कचरा कमी करणे, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या सवयी रुजवून ‘स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ कोल्हापूर’ घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
कोल्हापूरच्या 150 शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती; 7R संकल्पनेचे धडे
|