बातम्या

कोल्हापुरात प्रथमच श्री अमरनाथ गुफेची हुबेहूब प्रतिकृती; मस्कुती तलाव मंडळाचा अनोखा देखावा

kolhapur amarnath cave maskuti talav tarun mandal ganeshotsav 2026


By Shivani - 12/9/2026 2:55:14 PM
Share This News:



कोल्हापुरात प्रथमच साकारली श्री अमरनाथ गुफा; मस्कुती तलाव मंडळाचा अनोखा देखावा

कोल्हापूर प्रतिनिधी - 

गणेशोत्सवानिमित्त कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील मस्कुती तलाव तरुण मंडळाने यंदा श्री अमरनाथ गुफेची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. कोल्हापूर शहरात प्रथमच अशा स्वरूपाचा देखावा उभारण्यात आला असून, देखावा पाहताना नागरिकांना जणू प्रत्यक्ष अमरनाथ गुफेत असल्याचा अनुभव मिळणार आहे. मंडळाचे अध्यक्ष नितीन घाटगे आणि उपाध्यक्ष अक्षय पास्टे यांनी पत्रकार परिषदेत या देखाव्याची माहिती दिली. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता देखाव्याचा शुभारंभ होणार आहे.

अमरनाथ गुफेची सुमारे ६० फूट लांबीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या देखाव्यात ठिकठिकाणी नागरिकांना खऱ्या बर्फाचा अनुभव मिळणार असून, खऱ्या बर्फापासून शिवलिंगाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच देखाव्यात सुमारे २० फूट लांबीचा पूल, आकर्षक धबधबा आणि पाण्याचे तळे उभारण्यात आले आहे. तळ्यामध्ये बदके आणि मासेही सोडण्यात आले आहेत.

अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांना मिळणारा अनुभव कोल्हापुरातच नागरिकांना देता यावा, या उद्देशाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे, एक महिना दहा दिवसांच्या कालावधीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून हा संपूर्ण देखावा उभारला आहे.

पर्यावरणाची काळजी घेत देखाव्याच्या उभारणीत कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्यात आलेले नाही. लाकूड आणि इतर पूरक साहित्याचा वापर करून देखावा तयार करण्यात आला आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाही मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.

सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम

मस्कुती तलाव तरुण मंडळाकडून वर्षभर सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षी गणेशोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण देखावा सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे.

यंदाही सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी हार-तुरे न आणता शालेय साहित्य किंवा वह्या आणाव्यात, असे आवाहन केले आहे. जमा होणारे हे साहित्य परिसरातील शैक्षणिक संस्थांना देण्यात येणार आहे.

याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरजू कुटुंबांना मदत असे विविध उपक्रम मंडळाकडून राबवले जातात.

पट-सोंगट्यांच्या खेळालाही दिले पुनरुज्जीवन

दुर्मिळ होत चाललेल्या पट-सोंगट्यांच्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्याचे कामही मंडळाने केले आहे. हा खेळ पुन्हा सुरू करून महाराष्ट्रासह कर्नाटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात आला आहे.

१९ ते २४ सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत नागरिकांना अमरनाथ गुफेचा हा अनोखा देखावा पाहता येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देखावा पाहावा, असे आवाहन अध्यक्ष नितीन घाटगे यांनी केले.

यावेळी मंडळाचे सचिव फत्तेसिंह दिवेकर, नीस युवराज गोरमकर, आशिष गवळी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


कोल्हापुरात अमरनाथ गुफेचा अनोखा देखावा | मस्कुती तलाव तरुण मंडळ | गणेशोत्सव २०२६
Total Views: 17