शैक्षणिक
कोल्हापुरात डी. वाय. पाटील विद्यापीठात NCRC सायबर सुरक्षा केंद्र सुरू
By Administrator - 10/31/2026 5:48:58 PM
Share This News:
कोल्हापुरात सायबर सुरक्षेसाठी मोठे पाऊल! डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘एनसीआरसी’ सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, संशोधन आणि प्रशिक्षणाला मिळणार चालना; विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही होणार फायदा
कोल्हापूर :
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कोल्हापुरात महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे ‘नॅशनल सायबर रिसोर्स सेंटर’ (NCRC) सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्यविकासाला चालना मिळणार आहे.
नॅशनल सायबर सिक्युरिटी रिसर्च कौन्सिल (NCSRC), नवी दिल्लीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी, सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती आणि डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे केंद्र प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक करताना सायबर सुरक्षेचे ज्ञान केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न ठेवता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर करण्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. खलीराज ई. यांनी केंद्राच्या भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट करताना सायबर सुरक्षा क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्यविकासाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले. शैक्षणिक संस्था आणि समाज यांच्यात समन्वय साधून सायबर सुरक्षेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी विविध सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या. शाळा, महाविद्यालये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
कोल्हापूर सायबर क्राइम विभागाचे पोलीस निरीक्षक संजय हरुगले यांनी सायबर हल्ल्यांचे धोके, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेवर विशेष मार्गदर्शन
उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. एचडीएफसी पेन्शनचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी रवींद्र पिंगळे यांनी ‘डिजिटल युगातील सायबर सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले. नीयामोचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी सचिन कावळकर यांनी सायबर सुरक्षा क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि आवश्यक कौशल्यांची माहिती दिली. तर कोहेसिटी इन्क. (पूर्वीचे व्हेरिटास टेक्नॉलॉजी) येथील सिक्युरिटी आर्किटेक्ट जयंत दुसाने यांनी ‘सायबर सुरक्षेचे भविष्य’ या विषयावर आधुनिक सुरक्षा प्रणाली आणि भविष्यातील तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाला परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, सीएचआरओ श्रीलेखा साटम, डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, विविध संस्थांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. ग्रंथेज ओतारी यांनी आभार मानले.
या उपक्रमाला कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापुरात डी. वाय. पाटील विद्यापीठात NCRC सायबर सुरक्षा केंद्र सुरू
|