आरोग्य
कोल्हापुरात वस्ती-वस्त्यांमध्ये मोफत आरोग्यसेवा; अद्ययावत फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण
By Shivani - 9/24/2026 5:20:16 PM
Share This News:
शहरातील वस्ती-वस्त्यांमध्ये आता मोफत आरोग्यसेवा; अद्ययावत फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण
कोल्हापूर :
शहरातील वाड्या-वस्त्या आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या मोफत फिरत्या दवाखान्यासाठी नवीन अद्ययावत वाहनाचे लोकार्पण नाम. चंद्रकांतदादा पाटील आणि अंजली पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (२४ सप्टेंबर) भाजपा जिल्हा कार्यालयात करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, अभय वंटे आणि यल्लाप्पा गाडीवडर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दररोज दोन वस्त्यांमध्ये आरोग्यसेवा
या फिरत्या दवाखान्यात एक डॉक्टर आणि एक सहाय्यक अशी टीम कार्यरत आहे. दररोज दोन झोपडपट्टी किंवा वस्ती भागांमध्ये दवाखाना थांबवून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. आठवड्यातील सहा दिवसांमध्ये १२ ठिकाणी हा फिरता दवाखाना पोहोचतो.
दररोज सुमारे १०० ते १२५ नागरिक या आरोग्यसेवेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, आवश्यक उपचार तसेच गरजेनुसार औषधांचे मोफत वितरण या माध्यमातून केले जाते.
आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना दिलासा
शहरातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी होणारा खर्च आणि वेळ वाचवून घराच्या जवळच प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. फिरत्या दवाखान्यामुळे आरोग्यसेवेपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांपर्यंत थेट पोहोचणे शक्य होत आहे.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून समाजाच्या विविध गरजा लक्षात घेऊन लोकहिताचे उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून हा फिरता दवाखाना शहरातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये नियमितपणे आरोग्यसेवा देत आहे.
नवीन वाहनामुळे सेवेला मिळणार विस्तार
नवीन अद्ययावत वाहनामुळे फिरत्या दवाखान्याची सेवा अधिक प्रभावीपणे आणि व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. त्यामुळे ‘आरोग्यसेवा नागरिकांच्या दारी’ ही संकल्पना अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापुरात वस्ती-वस्त्यांमध्ये मोफत आरोग्यसेवा; अद्ययावत फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण
|