बातम्या

कोल्हापुरातील आयटीआय विद्यार्थ्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

kolhapur iti convocation dhananjay mahadik


By Administrator - 11/23/2026 6:04:01 PM
Share This News:



म्हादबा मिस्त्रींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, उद्यमनगरीचा वारसा पुढे न्या! खासदार धनंजय महाडिक यांचे आयटीआय विद्यार्थ्यांना आवाहन

कोल्हापूर :

कोल्हापूरची ओळख असलेल्या उद्यमनगरीचा पाया म्हादबा मिस्त्री यांनी रचला. त्यांनी श्रमांना प्रतिष्ठा आणि उद्योगांना गती दिली. त्यामुळे आयटीआयमधून कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उद्यमनगरीचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) केंद्र शासनाच्या शिल्पकार प्रशिक्षण योजनेंतर्गत दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध ३० अभ्यासक्रमांमधील प्रत्येकी पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यश पाटील, श्रुती कांबळे, सार्थक शिंदे, शिवराज वडार, प्रमोद कुंभोजकर, धनंजय उलपे, श्रावणी भोसले यांच्यासह विविध ट्रेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल क्रांती झाली आहे. स्किल इंडिया आणि स्टार्टअपसारख्या योजनांमुळे युवकांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. तरुणांनी केवळ नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे.

प्रारंभी प्राचार्य महेश आवटे यांनी संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला. आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लखनऊ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित आयटीआय विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. देशभरातील १२१ आयटीआय आणि २३ राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य विजयकुमार नार्वेकर, ज्योती कचरे, ए. सी. कांबळे, अपूर्वा सुतार, ऐश्वर्या माळकर, श्रीनिवास निळकंठ, भास्कर घोरपडे, सुजित कोकाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


कोल्हापुरातील आयटीआय विद्यार्थ्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
Total Views: 10