बातम्या

केएमटी बस तिकीट दरात ३ रुपयांची वाढ?

kolhapur kmt bus ticket price hike 2026


By Administrator - 11/19/2026 1:17:11 PM
Share This News:



कोल्हापूरकरांच्या खिशाला कात्री! KMT बस प्रवास महागणार; तिकिटात २ ते ३ रुपयांची वाढ प्रस्तावित

कोल्हापूर :

कोल्हापूर महानगर परिवहन उपक्रमाच्या (KMT) बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच केएमटीच्या तिकीट दरात २ ते ३ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे केएमटीचा प्रवास लवकरच महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पीएम ई-बस योजनेअंतर्गत कोल्हापूरला १०० ई-बस मंजूर झाल्या आहेत. या बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत असून सध्या निम्म्याच्या आसपास ई-बस रस्त्यावर धावत आहेत. याशिवाय जुन्या डिझेल बसही प्रवाशांच्या सेवेत आहेत. नव्या ई-बसची संख्या वाढत असताना त्यांच्या संचालनाचा खर्च आणि आर्थिक ताळमेळ राखण्यासाठी तिकीट दरवाढीचा विचार केएमटी प्रशासनाकडून सुरू आहे.

कोरोना महामारी आणि त्यानंतर झालेल्या डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी केएमटीने पास दरात वाढ केली होती. मात्र, बसची संख्या कमी होणे आणि प्रवाशांना अपेक्षित सेवा मिळत नसल्याने तिकीट दरात वाढ करण्यात आली नव्हती. आता ई-बसची सेवा सुरू झाल्याने पुन्हा एकदा दरवाढीचा प्रस्ताव पुढे आला आहे.

१० रुपयांवरील तिकिटांमध्ये २ ते ३ रुपयांची वाढ

केएमटीने तयार केलेल्या प्रस्तावानुसार १० रुपयांपेक्षा जास्त असलेल्या तिकिटांच्या दरात वाढ सुचवण्यात आली आहे. प्रस्तावित दरवाढीनुसार १२ रुपयांचे तिकीट १५ रुपये, १७ रुपयांचे तिकीट २० रुपये, तर २२ रुपयांचे तिकीट २५ रुपये होणार आहे. मात्र, १० रुपयांचे तिकीट जैसे थे ठेवण्याचे प्रस्तावित आहे.

विद्यार्थी पासही महागणार!

केवळ प्रवासी तिकिटेच नव्हे, तर विद्यार्थी पासच्या दरातही ५० रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नियमित केएमटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशावरही अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

ई-बसच्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी दरवाढीचा प्रयत्न

ई-बसच्या संचालनासाठी केएमटीला प्रत्येक किलोमीटरमागे खर्च करावा लागत आहे. हा आर्थिक फरक भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार असून राज्य सरकारकडूनही आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आर्थिक तफावतीचा भार कमी करण्यासाठी तिकीट दरवाढ उपयुक्त ठरेल, अशी केएमटी प्रशासनाची भूमिका आहे.

मात्र, या दरवाढीला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच नवीन दर लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आता कोल्हापूरकरांचे लक्ष महापालिकेच्या निर्णयाकडे लागले आहे.


केएमटी बस तिकीट दरात ३ रुपयांची वाढ?
Total Views: 15