बातम्या

कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन, जनता दरबार स्थगित; आचारसंहितेचा परिणाम

kolhapur municipal corporation lokshahi din janata darbar postponed


By Shivani - 1/10/2026 1:19:08 PM
Share This News:



आचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन, जनता दरबार स्थगित

कोल्हापूर :

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिकेचा लोकशाही दिन आणि जनता दरबार स्थगित करण्यात आला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. शासकीय सुट्टी असल्यास त्यानंतरच्या दिवशी हा उपक्रम घेतला जातो. नागरिकांना आपल्या तक्रारी व समस्या थेट मांडता याव्यात आणि त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

तसेच शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित केला जातो.

मात्र, महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणूक २०२६ अनुषंगाने कोल्हापूर शहरात मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या कालावधीत महापालिकेचा लोकशाही दिन तसेच जनता दरबार आयोजित केला जाणार नाही.

आचारसंहितेच्या कालावधीत हे दोन्ही उपक्रम स्थगित राहणार असल्याची नोंद संबंधित नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन, जनता दरबार स्थगित; आचारसंहितेचा परिणाम
Total Views: 12