बातम्या

कोल्हापुरात कचऱ्यात सापडले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण; सफाई कर्मचाऱ्यांनी केले परत

kolhapur municipal sanitation workers return gold necklace found in garbage


By Shivani - 9/21/2026 1:05:41 PM
Share This News:



कचऱ्यात सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण सफाई कर्मचाऱ्यांनी केले परत; महापालिकेकडून सत्कार

कोल्हापूर :

शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडताना महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. गौरी आगमनाच्या दिवशी कचऱ्यात सापडलेले सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण संबंधित महिलेचा शोध घेऊन परत करणाऱ्या चार सफाई कर्मचाऱ्यांचा कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सी वॉर्डातील सफाई कर्मचारी सुधीर इंगवले, महादेव कांबळे, अमृत कांबळे आणि अभिषेक गायकवाड यांना स्वच्छतेचे काम करत असताना कचऱ्यामध्ये सोन्याचे गंठण आढळले. मौल्यवान वस्तू स्वतःकडे न ठेवता त्यांनी त्याच्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

चौकशी केली असता हे गंठण मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी परिसरातील हॉटेल सारथी येथे काम करणाऱ्या धनश्री वरुटे यांचे असल्याचे समोर आले. त्यानंतर या चारही कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधून सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे तिच्याकडे सुपूर्द केले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत हॉटेल सारथीच्या मालकांनी त्यांचे कौतुक करत रोख बक्षीस देऊन सन्मान केला. त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळानेही त्यांच्या कार्याचा गौरव केला.

गणेश आरतीचा मान देत गौरव

विठ्ठल रामजी शिंदे चौकात कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तीची आरती करण्याचा मान या चारही सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्या हस्ते सुधीर इंगवले, महादेव कांबळे, अमृत कांबळे आणि अभिषेक गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी मौल्यवान वस्तू स्वतःकडे न ठेवता ती संबंधित व्यक्तीला परत केली. त्यांच्या या कृतीतून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर आला आहे.

या प्रसंगी कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, महापालिका कर्मचारी आणि सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापुरात कचऱ्यात सापडले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण; सफाई कर्मचाऱ्यांनी केले परत
Total Views: 12