राजकीय

कोल्हापुरात पोलिसांसाठी ७१ कोटींचे गृहसंकुल; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

kolhapur police housing complex 71 crore fadnavis inauguration


By Shivani - 9/8/2026 3:46:40 PM
Share This News:



कोल्हापुरात पोलिसांसाठी ७१ कोटींचे गृहसंकुल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : 

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कोल्हापुरात करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळामार्फत पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, महापौर रूपाराणी निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२०४ पोलीस कुटुंबांना मिळणार हक्काचे घर

कोल्हापूर पोलीस मुख्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या या गृहसंकुलात १८ मजली दोन निवासी इमारती आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये १०२ सदनिका असून एकूण २०४ निवासस्थानांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

७१ कोटी २८ लाखांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

या गृहसंकुलासाठी तब्बल ७१ कोटी २८ लाख रुपये खर्च करण्यात आला असून प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र २४ हजार १०१ चौरस मीटर आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतींमध्ये पर्यावरणपूरक व्यवस्थांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

सौर ऊर्जा आणि अत्याधुनिक सुविधा

गृहसंकुलाच्या छतावर सौर विद्युत प्रणाली उभारण्यात आली आहे. त्यासोबतच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि अत्याधुनिक अग्निशामक प्रणाली यांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि आधुनिक निवासाची सुविधा मिळणार आहे.

उद्घाटनावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुलामुळे कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या निवासाच्या सुविधेत महत्त्वपूर्ण भर पडली आहे.


कोल्हापुरात पोलिसांसाठी ७१ कोटींचे गृहसंकुल; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
Total Views: 19