बातम्या
ताराराणी चौकातील सिग्नलचे दोन खांब कोसळले; कंटेनर चालकाविरुद्ध कारवाई, दुरुस्ती सुरू
By Shivani - 10/7/2026 4:34:17 PM
Share This News:
कोल्हापूर :
शहरातील ताराराणी चौकात शुक्रवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात वाहतूक सिग्नलचे दोन खांब कोसळले. एका कंटेनरवर वाहून नेण्यात येत असलेल्या अवजड मशीनचा मागील भाग सिग्नलच्या केबलमध्ये अडकल्याने हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा अन्य अनुचित घटना घडली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरवर अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनाचा मागील भाग सिग्नलच्या केबलमध्ये अडकला. त्यामुळे केबलचा ताण वाढून सिग्नलचे दोन खांब रस्त्यावर कोसळले.
घटनेची माहिती मिळताच शहापुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर अग्निशमन दल तसेच महापालिकेच्या सिग्नल देखभाल विभागातील निलेश हासे आणि त्यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत रस्त्यावर पडलेले खांब बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.
या प्रकरणी संबंधित कंटेनर आणि चालकाला ताब्यात घेऊन शहापुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी दोन नवीन खांब बसविण्याचे काम सुरू असून, हे काम पूर्ण होण्यासाठी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, उद्या सायंकाळपर्यंत ताराराणी चौकातील वाहतूक सिग्नल पुन्हा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
Kolhapur Tararani Chowk Signal Poles Collapse
|