बातम्या
कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पासाठी धनंजय महाडिकांची केंद्राकडे मागणी
By Administrator - 11/25/2026 3:05:25 PM
Share This News:
कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पाला केंद्राने सहकार्य करावे; खासदार धनंजय महाडिकांची मागणी
कोल्हापूर :
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकल्पांतर्गत कृष्णा नदीतील सुमारे ५० टीएमसी अतिरिक्त पूरपाणी १३५ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे भीमा खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. सुमारे १३ हजार ६२२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे १.२५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार असून, मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याचा प्रस्ताव आहे.
सध्या प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारने आवश्यक मंजुरीची प्रक्रिया गतिमान करून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती महाडिक यांनी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका कमी होण्यासह सोलापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळू शकतो.
कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पासाठी धनंजय महाडिकांची केंद्राकडे मागणी
|