शैक्षणिक
महाराष्ट्र बोर्ड १०वी-१२वी परीक्षा २०२७; लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर
By Shivani - 9/18/2026 5:56:53 PM
Share This News:
महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी-१२वीच्या परीक्षा कधी? फेब्रुवारी-मार्च २०२७चे संभाव्य वेळापत्रक जाहीर
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी–मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
मंडळाने १७ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे तसेच परीक्षेचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
१२वीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता १२वीची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते मंगळवार, १६ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.
१२वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
१०वीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता १०वीची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, ११ मार्च २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
तर १०वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत.
विषयनिहाय वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार
या परीक्षा कालावधीतील विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी पुढील अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे मंडळाने कळविले आहे.
१०वी-१२वी परीक्षा २०२७ : महत्त्वाच्या तारखा
| परीक्षा |
लेखी परीक्षा |
प्रात्यक्षिक/तोंडी/अंतर्गत मूल्यमापन |
| इयत्ता १२वी |
८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ |
२० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ |
| इयत्ता १०वी |
१५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ |
२८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ |
महाराष्ट्र बोर्ड १०वी-१२वी परीक्षा २०२७; लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर
|