बातम्या
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू; ३४ हजार कर्मचारी ठाम
By Administrator - 11/18/2026 1:04:41 PM
Share This News:
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप दुसऱ्या दिवशीही सुरू; ३४ हजार कर्मचारी संपावर ठाम!
मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी दिलेली २६ नोव्हेंबरची तारीख लवकर मिळावी, अशी मागणी; महासंघाध्यक्ष दादासाहेब निकम यांचे आमरण उपोषण सुरूच
कोल्हापूर :
महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप दुसऱ्या दिवशीही सुरू असून, राज्यातील सुमारे ३४ हजार कर्मचारी संपावर ठाम आहेत. शासनाकडून अद्याप ठोस सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. मागण्यांबाबत शासन निर्णय (जीआर) लेखी स्वरूपात जारी होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी चर्चेसाठी वेळ दिला आहे. मात्र, चर्चेसाठी दिलेली तारीख खूप उशिराची असल्याचा आक्षेप न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. ही बैठक लवकरात लवकर व्हावी, यासाठी महासंघाचे पदाधिकारी उच्च न्यायालयात गेले आहेत. यावेळी उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरची तारीख मिळवण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी दिली.
दरम्यान, संपाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी संपात सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २०० सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण आंदोलन केले. याचवेळी महासंघाचे अध्यक्ष दादासाहेब निकम यांनी मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. रात्री उशिरा त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रकृती काहीशी बिघडत असल्याची माहिती समोर आली.
बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशीही राज्यातील ३४ हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून चर्चेची तारीख पुढे आणण्याबाबत हालचाली सुरू असल्या, तरी अद्याप मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा असंतोष कायम आहे.
‘शासन निर्णय निघेपर्यंत संप सुरूच!’
आमच्या मागण्यांबाबत केवळ चर्चेचे आश्वासन नको, तर ठोस निर्णय लेखी स्वरूपात शासन निर्णयाद्वारे मिळणे आवश्यक आहे. जोपर्यंत मागण्यांबाबतचा जीआर निघत नाही, तोपर्यंत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचारी प्रतिनिधींनी दिला आहे.
त्यामुळे न्यायालयीन कामकाजावर या संपाचा परिणाम कायम असून, शासन या आंदोलनावर काय तोडगा काढणार, याकडे राज्यातील न्यायालयीन कर्मचारी आणि संबंधितांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू; ३४ हजार कर्मचारी ठाम
|