व्यवसाय
शेतकरी कुटुंबातून उद्योगविश्वात भरारी; शिवाजी पोवारांना ‘महाराष्ट्र उद्योग भूषण’ पुरस्कार
By Shivani - 2/9/2026 4:50:34 PM
Share This News:
महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६ : शिवाजी पोवार यांचा दिमाखात गौरव
कागल : प्रतिनिधी - अजित बोडके
सामान्य शेतकरी कुटुंबातून उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे सामर्थ हायड्रोन्युमॅटिक ऑटोमेशन्स इंडिया, पुणेचे संचालक शिवाजी ज्ञानू पोवार यांना प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुणे येथे १ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या उल्लेखनीय औद्योगिक योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
Reseal.in यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात उद्योग, बँकिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रसिद्ध मराठी व हिंदी सिनेअभिनेते जितेंद्र जोशी यांच्या हस्ते शिवाजी पोवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी GST Commissioner, UCO बँकेचे मॅनेजर तसेच सिनेदिग्दर्शक सुधीर पाथाडे प्रमुख उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबातून उद्योगविश्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
शिवाजी पोवार यांचा उद्योगविश्वातील प्रवास संघर्ष, मेहनत आणि जिद्दीचे उदाहरण मानला जात आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोवार यांनी प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर, शेंडूर येथे, तर माध्यमिक शिक्षण मानव हायस्कूल, शेंडूर येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तब्बल १८ वर्षे मॅनेजर पदावर काम केले. या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी २०१४ मध्ये कोणतेही मोठे आर्थिक किंवा व्यावसायिक पाठबळ नसताना स्वतःच्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
‘समर्थ हायड्रोन्युमॅटिक ऑटोमेशन इंडिया’ या कंपनीची सुरुवात करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी उद्योगाचा विस्तार केला.
भोसरी MIDCमध्ये स्वतःची फॅक्टरी
आज MIDC, भोसरी, पुणे येथे शिवाजी पोवार यांच्या मालकीच्या जागेवर कंपनीचे कार्यालय आणि फॅक्टरी कार्यरत आहे. कार्यालयात ५, तर फॅक्टरीमध्ये १५ कर्मचारी कार्यरत असून कंपनीचे उत्पादन आणि कामकाज २४ तास सुरू असते.
सध्या कंपनीकडून भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी हायड्रोन्युमॅटिक ऑटोमेशनशी संबंधित कामे केली जात आहेत. भविष्यात कंपनीचा विस्तार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करण्याचा मानस शिवाजी पोवार यांनी व्यक्त केला आहे.
उद्योग क्षेत्रातील योगदानाची दखल
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक यश आणि प्रेरणादायी कामगिरीची दखल घेऊन शिवाजी पोवार यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६ देण्यात आला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका युवकाने आपल्या कौशल्य, अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर उद्योगविश्वात निर्माण केलेली ओळख ही अनेक नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे शिवाजी पोवार यांच्या औद्योगिक कार्याला मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६ : शिवाजी पोवार यांचा गौरव
|