बातम्या
मित्रानेच केला मित्राचा खून; मानपाड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार
By Shivani - 9/30/2026 4:28:30 PM
Share This News:
मित्रानेच केला मित्राचा खून; मानपाड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार, एकाला अटक
ठाणे :
मानपाडा येथील राजकीय गोळीबाराच्या घटनेने मुंबईसह ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात त्यांचा जुना मित्र पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
पाच राऊंड फायर; दोन गोळ्या लागल्या
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर तब्बल पाच राऊंड फायर केले. त्यापैकी दोन गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. एक गोळी मानेवर, तर दुसरी पायावर लागल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर, पोटावर आणि हातावरही वार करण्यात आले.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, पप्या शिंदे यानेच पूर्णेकर यांना रुग्णालयात नेल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आणि अटक करण्यात आली.
मित्रच बनला हल्ल्याचा सूत्रधार?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पप्या शिंदे आणि प्रदीप पूर्णेकर यांची जुनी मैत्री होती. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर मागील सहा-सात महिन्यांपासून दोघांमध्ये बोलणे बंद होते. मात्र, गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पप्या शिंदे पुन्हा पूर्णेकर यांच्या संपर्कात होता.
हल्ल्याच्या वेळीही पप्या शिंदे पूर्णेकर यांच्यासोबतच होता. त्याने आधी मित्र म्हणून कार्यालयात प्रवेश केला आणि बराच वेळ पूर्णेकर यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यानंतर इतर संशयितांना कथितरित्या संकेत दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
चार जणांनी केला हल्ला?
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण पाच संशयितांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यापैकी पप्या शिंदेला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
कनोजिया उर्फ टल्ली आणि आणखी एका शूटरने पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. तर इतर दोन संशयितांनी चोपर आणि चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर चौघेही घटनास्थळावरून फरार झाले, तर पप्या शिंदे पूर्णेकर यांच्यासोबतच थांबला आणि त्यांना रुग्णालयात घेऊन गेला.
पप्या शिंदेविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद
पप्या शिंदे याच्यावर २००४ पासून आतापर्यंत ८ ते ९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. २०१४ मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती.
दरम्यान, या हल्ल्यामागे राजकीय आणि सोशल कारणांवरून निर्माण झालेला वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण आणि कटामागील भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
फरार संशयितांच्या शोधासाठी ९ ते १० पथके रवाना
पूर्णेकर हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी क्राइम ब्रांचसह पोलिसांची ९ ते १० पथके रवाना करण्यात आली आहेत. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर संशयितांनाही लवकरच पकडण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मानपाड्यातील या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळातही या हल्ल्याची चर्चा सुरू आहे.
मित्रानेच केला मित्राचा खून; मानपाड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार
|