बातम्या
मराठवाडा मुक्ती संग्राम : १७ सप्टेंबरचा इतिहास आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व
By Shivani - 9/14/2026 5:06:07 PM
Share This News:
मराठवाडा मुक्ती संग्राम : लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा इतिहास
छत्रपती संभाजीनगर :
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने संघर्ष करावा लागला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती स्वीकारल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतीय संघात विलीन झाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो.
हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नव्हते
ब्रिटिश सत्ता संपल्यानंतर भारतातील संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी हैदराबाद स्वतंत्र ठेवण्याची भूमिका घेतली होती. भारत सरकार आणि हैदराबाद संस्थान यांच्यात वाटाघाटी सुरू असताना ‘जैसे थे’ करार करण्यात आला. मात्र संस्थानातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली.
नागरी हक्क, जबाबदार शासन आणि भारतीय संघात सहभागी होण्याच्या मागणीसाठी जनआंदोलन उभे राहिले. हैदराबाद स्टेट काँग्रेस, महाराष्ट्र परिषद आणि विविध सामाजिक व राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी या चळवळीला दिशा दिली.
मराठवाड्यात राष्ट्रीय विचारांची जागृती
मराठवाडा मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी अनेक वर्षांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जागृतीतून तयार झाली होती. परभणीचे नूतन विद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे सरस्वती भुवन विद्यालय, हिप्परगा येथील शारदा मंदिर, अंबाजोगाईचे योगेश्वरी विद्यालय, उदगीरचे श्यामलाल विद्यालय, लातूरचे ज्युबिली विद्यालय, बीडचे चंपावती विद्यालय आणि नांदेडचे प्रतिभा निकेतन यांसारख्या संस्थांनी राष्ट्रीय विचारांच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली.
स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या प्रेरणेने या कार्याला बळ मिळाले. १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेनंतर या संघर्षाला संघटित राजकीय स्वरूप प्राप्त झाले. निजाम सरकारने संघटनेवर बंदी घातल्यानंतर सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान
स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा आणि बाळासाहेब परांजपे यांच्यासह अनेक नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले.
काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, आ. कृ. वाघमारे, विनायकराव चारठाणकर आणि विश्वनाथराव कातमेश्वरकर यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनीही या लढ्यात योगदान दिले. गावागावातील संघर्षात असंख्य अनामिक वीरांनी बलिदान दिले.
आठ जिल्ह्यांत मुक्ती संग्रामाची धग
आजच्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे आठ जिल्हे आहेत. या संपूर्ण मराठी भाषिक प्रदेशाने हैदराबाद मुक्तीच्या लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.
नांदेड, परभणी, सेलू, जालना, अंबड, बीड, धाराशिव, लातूर, अंबाजोगाई, उदगीर, उमरी, धर्माबाद, कंधार आणि देगलूर आदी भागांत सत्याग्रह, जनजागृती आणि विविध स्वरूपाचे प्रतिकार आंदोलन झाले.
रजाकारांच्या दडपशाहीविरोधात लोकशक्ती
स्वातंत्र्य आणि भारतीय संघात विलिनीकरणाच्या मागणीला तत्कालीन सत्तेकडून विरोध झाला. आंदोलनकर्त्यांना अटक, कारावास आणि दडपशाहीचा सामना करावा लागला. रजाकारांच्या हिंसक कारवायांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.
लोकशाही, नागरी हक्क आणि जबाबदार शासनासाठी जनतेने संघर्ष सुरू ठेवला. १९४२ च्या ‘भारत छोडो’ चळवळीतही हैदराबाद संस्थानातील अनेक भागांत सत्याग्रहींनी सहभाग घेतला होता. या संघर्षामुळे स्वातंत्र्यवादी शक्ती अधिक संघटित झाल्या.
‘ऑपरेशन पोलो’ आणि हैदराबादचे विलीनीकरण
भारत सरकारने सुरुवातीला हैदराबादचा प्रश्न संवाद आणि वाटाघाटींच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निर्णायक भूमिका घेतली.
१३ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन पोलो’ सुरू केले. भारतीय सैन्याच्या कारवाईसमोर हैदराबाद संस्थानाचा प्रतिकार फार काळ टिकला नाही. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती स्वीकारली आणि हैदराबाद संस्थान भारतीय संघात सहभागी झाले.
हैदराबादचे विलीनीकरण हे भारताच्या राजकीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते.
भाषावार प्रांतरचनेनंतर मराठवाडा महाराष्ट्रात
१९४८ मध्ये भारतीय संघात समाविष्ट झालेले हैदराबाद संस्थान नंतर भाषावार प्रांतरचनेनुसार वेगवेगळ्या राज्यांत विभागले गेले. मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्राचा भाग झाला, तर तेलुगू भाषिक प्रदेश तेलंगणात आणि कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट झाला.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठवाडा आधुनिक महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला.
१७ सप्टेंबर ‘मुक्ती संग्राम दिवस’
महाराष्ट्र शासनाने ४ मे २००१ रोजी शासन निर्णयाद्वारे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा विभागात ‘मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात विविध शासकीय आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण, स्मृतिस्तंभाला अभिवादन, हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि मानवंदना असे कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही विविध कार्यक्रमांद्वारे मुक्ती संग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले जाते.
इतिहासातून लोकशाहीची प्रेरणा
मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा इतिहास नाही. तो स्वातंत्र्य, लोकशाही, नागरी हक्क, लोकसहभाग आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांची आठवण करून देणारा संघर्ष आहे.
१७ सप्टेंबर रोजी तिरंगा अभिमानाने फडकताना या लढ्यात योगदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले जाते. मराठवाड्याच्या भूमीने भारतीय संघाच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान इतिहासात अढळ आहे.
म्हणूनच १७ सप्टेंबर हा केवळ स्मरणाचा दिवस नसून मराठवाड्याच्या लोकशक्तीला, देशभक्तीला आणि अखंड भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला अभिवादन करण्याचा दिवस आहे.
— प्रवीण टाके, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
मराठवाडा मुक्ती संग्राम : १७ सप्टेंबरचा इतिहास आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व
|