राजकीय
गारगोटीत मनसेचा महावितरणवर मोर्चा युवराज येडूरे आक्रमक
By nisha patil - 6/8/2026 3:46:41 PM
Share This News:
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात मनसेचा गारगोटीत महावितरणवर धडक मोर्चा; युवराज येडूरे यांचा आंदोलनाचा इशारा
गारगोटी :
स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वीज ग्राहकांच्या विविध समस्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. भुदरगड तालुका मनसेच्या वतीने गारगोटी येथील महावितरण कार्यालयावर धडक निषेध मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मारक (क्रांती चौक) येथून सुरू झालेल्या या मोर्चात शेतकरी, व्यापारी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी "स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा" अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण प्रशासनाचा निषेध केला.
स्मार्ट मीटर सक्तीला मनसेचा विरोध
महावितरण कार्यालयासमोरील सभेत मनसे नेते डॉ. युवराज येडूरे यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीवर प्रश्न उपस्थित केले. ग्राहकांशी संवाद न साधता कोणतीही योजना लागू करू नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच वाढीव आणि चुकीच्या वीज बिलांची चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, वीज बिलांमध्ये पारदर्शकता आणावी आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
महावितरणला निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा
यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास मनसेच्या वतीने अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. युवराज येडूरे यांनी दिला. या मोर्चावेळी तालुकाध्यक्ष राहुल पाटील, के. के. भारतीय, राहुल कुंभार यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Smart Meter Protest Kolhapur
|