कृषी
पर्यावरणीय समतोल राखणे गरजेचे; मोनिका मोहिते यांचे प्रतिपादन
By Shivani - 10/27/2026 4:44:56 PM
Share This News:
पर्यावरणीय समतोल राखणे काळाची गरज; सेंद्रिय शेतीशिवाय आरोग्य जपणे कठीण - मोनिका मोहिते
कोल्हापूर :
पर्यावरणीय समतोल राखणे आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. भविष्यात आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय उत्पादनांचे महत्त्व अधिक वाढणार असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजिका मोनिका मोहिते यांनी केले.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. रोपाला पाणी घालून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
सेंद्रिय उत्पादनांच्या किमतीबाबत गैरसमज दूर होणे गरजेचे
मोनिका मोहिते यांनी आपल्या सेंद्रिय शेतीतील उत्पादनांची उदाहरणे देत सेंद्रिय शेतीबाबत समाजात असलेल्या गैरसमजांवर भाष्य केले. सेंद्रिय उत्पादने महाग असतात, असा अनेकांचा समज आहे. मात्र, ही उत्पादने तयार करण्यासाठी अधिक मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांची किंमत रास्त असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
माणूस औषधे आणि इतर गोष्टींवर अनावश्यक खर्च करतो; मात्र आरोग्यदायी व जीवनावश्यक गोष्टींसाठी काटकसर करतो, ही दुर्दैवी बाब आहे. शेती आणि शेतकरी यांना समाजात अपेक्षित प्रतिष्ठा मिळत नसल्याने या क्षेत्राबाबत उदासीनता दिसून येते. प्रत्यक्षात शेती उत्पादनांशिवाय मानवी जीवन सुसह्य होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरणीय चित्रपट महोत्सवांसारख्या उपक्रमांतून पर्यावरण रक्षण आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्यावर भर
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांनी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. अशा उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांनी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. किर्लोस्कर कंपनीचे साईड लीडर सुरेश मगदूम यांनी कंपनी शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले. मानव संसाधन अधिकारी हरीश सायवे यांनी पर्यावरण जागृतीमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांच्या सक्रिय सहभागातूनच पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना गती मिळू शकते, असे सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, शाश्वत विकास मंचाच्या डॉ. पूजा पाटील, लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई, विविध विभागांतील प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पूनम माने आणि प्रा. महेंद्र जनवाडे यांनी केले, तर समन्वयक प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी आभार मानले.
१२ पर्यावरणीय माहितीपटांचे प्रदर्शन; विविध स्पर्धांना प्रतिसाद
महोत्सवादरम्यान दिवसभरात सुमारे १२ पर्यावरणविषयक माहितीपट दाखवण्यात आले. यासोबतच पर्यावरणावर आधारित रील मेकिंग, छायाचित्र स्पर्धा, घोषवाक्य लेखन, फेस पेंटिंग, कविता आणि पर्यावरणीय नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये सुमारे ५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
महोत्सवाच्या पुढील सत्रात डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. शिंपा शर्मा यांच्यासह चिदंबर शिंदे, तेजस झगडे आणि सागर चौगुले यांची व्याख्याने व कार्यशाळा होणार आहेत.
समारोपीय सत्रात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या रोहित आणि रक्षिता बनसोडे या बहीण-भावंडांचा पर्यावरणीय योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन तायडे, अन्वर फकीर, रितेश कांबळे, प्रा. अनघा खत्री, प्रा. ऋतुजा माळी यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पर्यावरणीय समतोल राखणे गरजेचे; मोनिका मोहिते यांचे प्रतिपादन
|