शैक्षणिक
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि एन.आय.आय.टी. फाउंडेशन यांच्यात कौशल्य विकासासाठी सामंजस्य करार
By nisha patil - 4/15/2025 5:04:15 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. 15 :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि एन. आय. आय. टी. फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यात आज एक ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश म्हणजे तरुणांना रोजगारक्षम बनविणे, कौशल्यविकासाला गती देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करणे.
या कराराअंतर्गत आयबीएम स्किल्स-बिल्ड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा अनॅलिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे आणि एन. आय. आय. टी. फाउंडेशनचे प्रतिनिधी दीपक कुमार त्रिवेदी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या उपक्रमात विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर; रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव; पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव; दत्ताजीराव कदम कॉलेज, इचलकरंजी; राजे रामराव महाविद्यालय, जत; डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मिरज; सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर; दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी; डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर या महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी केले. एन. आय. आय. टी. फाउंडेशनचे श्री. त्रिवेदी यांनी कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाचा सविस्तर आराखडा मांडला. यावेळी बोलताना सौ. शुभांगी गावडे यांनी, “कौशल्यपूर्ण युवकच आत्मविश्वासपूर्ण असतो. ज्ञान आणि कौशल्यनिर्मिती ही सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे,” असे मत व्यक्त केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यांच्या स्पर्धात्मक क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. सुदर्शन महाडिक यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. विराज जाधव यांनी समन्वयाचे काम पाहिले.
हा करार विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींचे दार उघडणारा ठरणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाऊड कॉम्प्युटिंगप्रशिक्षण मिळणार
|