मनोरंजन
‘मृत्यूचक्र’मध्ये शशांक शेंडेंचा रहस्यमय ‘जना काका’ अवतार; लूक रिव्हीलने वाढली उत्सुकता!
By Shivani - 8/18/2026 5:46:44 PM
Share This News:
‘मृत्यूचक्र’मध्ये शशांक शेंडेंचा रहस्यमय अंदाज; ‘जना काका’च्या भूमिकेने वाढवली उत्सुकता!
Marathi Movie Update News -
अभिनेते शशांक शेंडे यांनी आपल्या कारकिर्दीत विविध छटांच्या व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. आता ते एका वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आगामी मराठी थ्रिलर चित्रपट ‘मृत्यूचक्र’ मध्ये शशांक शेंडे ‘जना काका’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, नुकताच त्यांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
‘जना काका’च्या चेहऱ्यामागे दडलंय काय?
‘मृत्यूचक्र’मध्ये शशांक शेंडे साकारत असलेले जना काका हे गावाकडच्या मातीत रुजलेले, मनमोकळे आणि मिश्कील स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या सहज वागण्या-बोलण्यातून ते प्रेक्षकांना सुरुवातीला अगदी आपलेसे वाटतात.
मात्र, चित्रपटाची कथा पुढे सरकत असताना जना काकांच्या व्यक्तिरेखेत दडलेले गूढ हळूहळू समोर येत असल्याचे संकेत मिळतात. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि परिस्थितीकडे पाहण्याच्या पद्धतीत काहीतरी रहस्य दडलेले असल्याची उत्सुकता निर्माण होते.
चित्रपटातील घटना अधिकाधिक गूढ होत जातात तसतसा ‘जना काका नेमके कोण आहेत?’ हा प्रश्नही अधिक गंभीर बनतो. त्यांच्या साध्या आणि मिश्कील चेहऱ्यामागे ‘मृत्यूचक्र’च्या कथानकातील एखादी महत्त्वाची कडी दडलेली आहे का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
विनोदासोबत रहस्याचीही किनार
शशांक शेंडे यांनी ‘जना काका’च्या भूमिकेत सहज अभिनयासोबत विनोद आणि रहस्याचा अनोखा मेळ साधल्याचे दिसून येते. त्यामुळे ही व्यक्तिरेखा चित्रपटातील लक्षवेधी भूमिकांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
जना काका खरंच साधे-सरळ आहेत का? त्यांच्या शांत चेहऱ्यामागे कोणतं गूढ दडलं आहे? ‘मृत्यूचक्र’च्या रहस्यात त्यांची भूमिका नेमकी काय आहे? या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.
‘मृत्यूचक्र’ हा आगामी मराठी थ्रिलर चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, शशांक शेंडेंची ‘जना काका’ची भूमिका प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
मृत्यूचक्रमध्ये शशांक शेंडे ‘जना काका’; लूक रिव्हील
|