बातम्या

नेपाळच्या पुरात वाहून आला बँकेचा लॉकर; फोडून काढले ९२ लाख रुपये, २९ जणांना अटक

nepal flood bank locker 92 lakh cash 29 arrested


By Shivani - 8/29/2026 3:57:34 PM
Share This News:



नेपाळच्या पुरात वाहून आला बँकेचा लॉकर; फोडून ९२ लाख रुपये काढले, २९ जणांना अटक

Nepal Flood News -

नेपाळमध्ये विनाशकारी पुरामुळे हाहाकार उडाला असताना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. पुराच्या प्रवाहात वाहून आलेला बँकेचा लॉकर फोडून त्यातील तब्बल 92 लाखांहून अधिक नेपाळी रुपये काढल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 29 जणांना ताब्यात घेतले आहे.

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी परिसरातून पुराच्या जोरदार प्रवाहात बँकेची जड तिजोरी वाहून गेली होती. ही तिजोरी धादिंग जिल्ह्यातील गल्छी गावपालिका-4 येथील बेलखूखोला परिसरातील त्रिशूली नदीच्या काठावर आढळून आली.

दरम्यान, स्थानिक नागरिक लॉकर तोडून त्यातील रोकड काढत असल्याची माहिती धादिंग पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेपाळ पोलीस आणि सशस्त्र प्रहरी बलाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

92 लाखांहून अधिक रोकड जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून 29 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून 92,68,505 नेपाळी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या बहुतांश संशयितांचे वास्तव्य गल्छी-4 येथील मास्टर गावात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याशिवाय गल्छी-6 येथील आदमघाट, सिद्धलेक-7 येथील आदमटार तसेच चितवन आणि पर्सा येथील काही नागरिकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

लॉकर नेमका कोणत्या बँकेचा?

पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली रोकड नेमकी कोणत्या बँकेची आहे, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

मृत महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्याही चोरल्या

दरम्यान, पुराच्या काळात माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना नारायणी नदीजवळ समोर आली आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका मृत महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेतल्याचा आरोप दोन व्यक्तींवर आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, आपत्तीच्या काळात समोर आलेल्या या घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे.


Nepal Flood: पुरात वाहून आलेला बँकेचा लॉकर फोडला; ९२ लाख रुपये लुटले, २९ जणांना अटक
Total Views: 18