बातम्या

नॉनव्हेज अन् पैशांवरून वाद; वडिलांनीच मुलाचा गळा आवळला, आईलाही अटक

nonveg paise varun vad vadilanni mulacha gala awalla aaila atarak pune


By Shivani - 8/27/2026 5:18:08 PM
Share This News:



नॉनव्हेज अन् पैशांवरून वाद; वडिलांनीच मुलाचा गळा आवळला, आईलाही अटक

पुणे :

दारूच्या व्यसनामुळे दररोज घरात वाद घालणाऱ्या मुलाचा वडिलांनी गळा आवळून आणि डोक्यात मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या आईलाही अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत आणि पार्वती यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दारू पिऊन दररोज घरात वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, महेशचे लग्न झाले होते; मात्र त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. महेशला दारूचे व्यसन होते. तो मजुरी आणि प्लंबिंगचे काम करत होता. गायकवाड कुटुंब वारजेतील रामनगर परिसरात तिरंगा मित्र मंडळाजवळ राहत होते. महेश आणि त्याचा मोठा भाऊ गणेश हे शेजारी राहत होते. महेश दारू पिल्यानंतर आई-वडिलांशी वारंवार वाद घालत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

नॉनव्हेज आणि पैशांवरून वादाचे रूपांतर हाणामारीत

२४ ऑगस्टच्या रात्री महेश दारू पिऊन घरी आला. त्याने नॉनव्हेज जेवणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. श्रावण सुरू असल्याने वडिलांनी घरी नॉनव्हेज नसल्याचे सांगितले. त्यानंतर महेशने वडिलांकडे पैशांची मागणी केली. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

दररोजच अशा प्रकारचे वाद होत असल्याने शेजारी राहणाऱ्या भावाने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी वडिलांनी महेशच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली. तसेच त्याचा गळा आवळल्याचा आरोप आहे.

सकाळी खोलीतून बाहेर न आल्याने प्रकार उघड

दुसऱ्या दिवशी सकाळी महेश खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ आणि नातेवाईकांनी खोलीत जाऊन पाहिले असता महेश बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महेशला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शवविच्छेदनातून खुनाचा उलगडा

शवविच्छेदन अहवालात महेशचा गळा आवळल्याने तसेच डोक्यात झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. भाऊ आणि नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांकडेही कसून विचारणा केली. सुरुवातीला त्यांनी घटनेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, पोलिसांच्या चौकशीत वडिलांनीच महेशचा खून केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी भागवत गायकवाड यांना अटक केली.

रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर सांडलेले रक्त पुसून तसेच घटना लपविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून महेशची आई पार्वती हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


पुण्यात नॉनव्हेज अन् पैशांवरून वाद; वडिलांनी मुलाचा गळा आवळून केला खून
Total Views: 18