बातम्या
निसर्गाची तोडफोड करणाऱ्या 5 तरुणांवर कारवाई
By nisha patil - 6/8/2026 3:56:01 PM
Share This News:
रील बनवण्याच्या नादात निसर्गाची तोडफोड; पन्हाळा वनक्षेत्रात 5 तरुणांवर कारवाई, 10 हजारांचा दंड
पन्हाळा । प्रतिनिधी (शाहबाज मुजावर) :
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात निसर्गाची हानी करणाऱ्या पाच तरुणांवर पन्हाळा वन विभागाने कारवाई केली आहे. मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात रील तयार करताना नैसर्गिक वनस्पतींची तोडफोड केल्याप्रकरणी संबंधित तरुणांकडून 10 हजार रुपयांचा उपद्रव शुल्क दंड वसूल करण्यात आला. 03 ऑगस्ट रोजी 'पाटील सुरज 02' या इंस्टाग्राम अकाउंटवरून मौजे वादेवाडी येथील कक्ष क्रमांक 850 मधील मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात वनस्पतींची नासधूस करत रील तयार केल्याची माहिती पन्हाळा वन विभागाला मिळाली होती.
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पन्हाळा आणि वन विभागाच्या पथकाने चौकशी सुरू केली. तपासादरम्यान रीलमध्ये सहभागी असलेल्या पाच तरुणांची ओळख पटवण्यात आली. यामध्ये सुरज प्रकाश पाटील (रा. निवडे, ता. पन्हाळा), सुमित हिदुराव गुरव (रा. सोनुर्ले, ता. शाहुवाडी), रोहित सुनील जाधव (रा. कोलोली, ता. पन्हाळा), सुरज मारुती पाटील (रा. नंदगाव, ता. शाहुवाडी), सिद्धीराज जानदेव पाटील (रा. निवडे, ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान संबंधित तरुणांनी वन नियमांचे उल्लंघन केल्याची कबुली दिल्यानंतर वन विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी, वनपाल सागर पठाडे, वनरक्षक राहुल जोनवाल आणि किरण पाटील यांच्या पथकाने केली.
निसर्गाची हानी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
सोशल मीडियासाठी प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात वनसंपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे.
Kolhapur Forest Department Action
|