राजकीय
४८८ कोटींचा पाईपलाईन प्रकल्प ठप्प; SIT चौकशीची भाजपकडून मागणी
By nisha patil - 8/30/2025 7:48:37 PM
Share This News:
कोल्हापूर :कोल्हापूर शहरात सणासुदीच्या काळात सलग पाच दिवस पाणीपुरवठा ठप्प राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल ४८८ कोटी खर्चून उभारलेला थेट पाईपलाईन प्रकल्प वारंवार बिघाडामुळे बंद पडत असून, तो कोल्हापुरकरांसाठी ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी केली.
२०१२ मध्ये मंजूर होऊन २०१३ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प २०२३ मध्ये कसा बसा पूर्ण झाला; परंतु पंप, ट्रान्सफॉर्मर व वीजवाहिनीतील अडचणींमुळे पाणीपुरवठा सतत ठप्प होत आहे. योजनेतील भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामगिरीवर SIT चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रा. जयंत पाटील यांनी बंटी पाटलांच्या अट्टहासापोटी हा प्रकल्प उभा राहिल्याचा आरोप करत, “जंगलातून गेलेल्या ५६ किलोमीटरच्या मार्गापैकी १७ किलोमीटरमध्ये कुणाचीही परवानगी न घेता काम झाले. आतापर्यंत १८ वेळा झाडांच्या फांद्या पडून पाणीपुरवठा बंद पडला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही तंत्रज्ञ उपलब्ध नसतात… हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,” अशी टीका केली.
तज्ञांच्या मते, नवे पंप बसवण्याऐवजी संपूर्ण यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानासह बदलणे आवश्यक आहे. या बैठकीला प्रा. जयंत पाटील, माजी महापौर दीपक जाधव, माजी उपमहापौर विलास वास्कर, मुरलीधर जाधव, अजित ठाणेकर, विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, राजसिंह शेळके, किरण नकाते, विजय खाडे पाटील, शेखर कुसाळे, उत्तम कोराणे, भाग्यश्री शेटके, रूपाराणी निकम, मनिषा कुंभार, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, रवींद्र मुतगी आदी उपस्थित होते.
४८८ कोटींचा पाईपलाईन प्रकल्प ठप्प; SIT चौकशीची भाजपकडून मागणी
|