राजकीय
पुणे पदवीधर निवडणुकीसाठी सुमेद कांबळेंची तयारी; विद्यार्थी-पदवीधरांसाठी तरुण नेतृत्व
By Shivani - 4/9/2026 3:37:51 PM
Share This News:
पुणे पदवीधर मतदारसंघातून सुमेद कांबळे यांची उमेदवारीची तयारी; विद्यार्थी-पदवीधरांच्या प्रश्नांसाठी तरुण नेतृत्वाचा संकल्प
कोल्हापूर प्रतिनिधी -
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठवडगाव, जि. कोल्हापूर येथील सुमेद शशिकांत कांबळे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. विद्यार्थी, पदवीधर, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याच्या अनुभवाच्या बळावर विधानपरिषदेत प्रभावीपणे प्रश्न मांडण्याचा त्यांचा मानस आहे.
१० ऑक्टोबर १९९९ रोजी जन्मलेल्या सुमेद कांबळे यांनी B.A., Lib. & I.Sc. पर्यंत शिक्षण घेतले असून सध्या ते पत्रकारिता आणि नोकरीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना विद्यार्थी, युवक, शिक्षण, रोजगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा
शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा व्यवस्था आणि विद्यापीठाशी संबंधित विविध अडचणींवर कांबळे यांनी आवाज उठविला आहे. आर्थिक तसेच प्रशासकीय अडचणींमुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन संबंधित प्रशासनाशी चर्चा करणे, प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणे, यावर त्यांनी भर दिला आहे.
पेपरफुटीविरोधात भूमिका
परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता हा देखील त्यांच्या प्रमुख अजेंड्यापैकी एक आहे. पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात आयोजित आंदोलनांमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून जनप्रश्नांना व्यासपीठ
पत्रकार म्हणून काम करताना स्थानिक आणि सामाजिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. Live महाराष्ट्र / Live Maharashtra News या माध्यमातून विद्यार्थी, युवक, शिक्षण, रोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रसिद्धी देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केल्याचा त्यांचा दावा आहे.
पत्रकारितेच्या अनुभवातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न जवळून समजून घेण्याची संधी मिळाली असून, याच अनुभवाच्या आधारे सार्वजनिक जीवनात व्यापक भूमिका बजावण्याचा त्यांचा मानस आहे.
रोजगारापासून स्पर्धा परीक्षांपर्यंत प्रश्नांना प्राधान्य
पुणे पदवीधर मतदारसंघातील युवक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावीपणे मांडण्याचा संकल्प कांबळे यांनी व्यक्त केला आहे. रोजगार, कौशल्यविकास, स्वयंरोजगाराच्या संधी, शिक्षण, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा व्यवस्था तसेच विद्यापीठाशी संबंधित प्रश्न हे त्यांच्या प्रमुख प्राधान्यक्रमात आहेत.
तसेच MPSC, UPSC, NET-SET आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांविरोधात प्रभावी पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
पदवीधरांचा आवाज विधानपरिषदेत पोहोचवायचा
“पदवीधरांच्या प्रश्नांची जाणीव असलेला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेला आणि सामान्य कुटुंबातून आलेला तरुण प्रतिनिधी विधानपरिषदेत असावा,” अशी भूमिका सुमेद कांबळे यांनी व्यक्त केली.
विद्यार्थी आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर काम करण्याचा अनुभव, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न समजून घेण्याची संधी आणि प्रशासनाशी संवाद साधून प्रश्न सोडविण्याचा अनुभव या बळावर पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस आहे.
आगामी काळात पदवीधर मतदारसंघातील युवक आणि पदवीधरांशी व्यापक संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
सुमेद कांबळे | पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६
|