बातम्या
पुण्यात वेताळ टेकडीवर अल्पवयीन मित्राची हातोडीने हत्या; ‘विरोधी पार्टीचे स्टेटस’ ठेवल्याचा राग
By Shivani - 8/20/2026 3:58:52 PM
Share This News:
पुण्यात वेताळ टेकडीवर अल्पवयीन मित्राची हातोडीने हत्या; ‘विरोधी पार्टीचे स्टेटस’ ठेवल्याचा राग
पुणे :
पुण्यातील एआरएआय अर्थात वेताळ टेकडीवर बुधवारी मध्यरात्री एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी डोक्यात हातोडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलवर आरोपींच्या विरोधकांच्या बाजूने ‘स्टेटस’ ठेवल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन्ही १७ वर्षीय अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
‘विरोधी पार्टीचे स्टेटस’ ठेवल्याचा राग
मयत तरुण आणि दोन्ही आरोपी हे विधीसंघर्षित बालक असून तिघांचेही वय १७ वर्षे आहे. ते कोथरूड परिसरातील श्रावणधारा सोसायटी भागात राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून तिघांमध्ये मैत्री होती. मयत तरुण बारावीमध्ये शिक्षण घेत होता. आरोपींपैकी एक बारावीमध्ये शिकत असून दुसरा कोणतेही काम करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही दिवसांपूर्वी आरोपींपैकी एकाचे त्याच्या विरोधकांशी भांडण झाले होते. या वादाची तिघांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतरही मयत तरुण आरोपींच्या विरोधकांच्या बाजूने मोबाईलवर वारंवार ‘स्टेटस’ ठेवत होता. ‘त्यांचा स्टेटस ठेवू नकोस’, अशी ताकीद आरोपीने त्याला अनेकदा दिली होती. मात्र, त्याने स्टेटस ठेवणे सुरूच ठेवल्याने आरोपींच्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण झाला.
राजगडावर फिरायला नेले अन् वेताळ टेकडीवर आणले
याच रागातून दोन्ही आरोपींनी मित्राची हत्या करण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींनी मयत तरुणाला राजगडावर फिरायला जाण्यासाठी सोबत घेतले. मंगळवारी तिघेही राजगडावर गेले. रात्री उशिरा पुण्यात परतल्यानंतर आरोपी त्याला वेताळ टेकडीवर घेऊन गेले.
मध्यरात्रीच्या सुमारास वेताळ टेकडीवरील निर्मनुष्य ठिकाणी दोन्ही आरोपींनी त्याच्या डोक्यात हातोडीने जोरदार वार केले. गंभीर दुखापत झाल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
सकाळी नागरिकांना आढळला मृतदेह
बुधवारी सकाळी वेताळ टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपास सुरू केला. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित दोन्ही अल्पवयीन आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले.
कोथरूड पोलिसांकडून पुढील तपास
मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अल्पवयीन आरोपींकडे चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम, वापरलेले हत्यार आणि इतर बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
वेताळ टेकडीवर अल्पवयीन मित्राची हत्या; स्टेटसच्या वादातून पुण्यात खळबळ
|