कृषी
राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात; शक्तीपीठ महामार्ग, विद्यार्थी आंदोलन आणि ‘सद्बुद्धी दिंडी’ची घोषणा
By Shivani - 7/16/2026 2:56:39 PM
Share This News:
राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात; शक्तीपीठ महामार्ग, विद्यार्थी आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग, विद्यार्थी आंदोलन आणि केंद्र-राज्य सरकारच्या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा देत त्यांनी १३ जिल्ह्यांतील शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
राजू शेट्टी म्हणाले, "पक्ष बाजूला ठेवा, शेती वाचवा." हा लढा कोणत्याही पक्षाचा नसून शेतकरी, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या अस्तित्वाचा आहे. त्यामुळे राजकीय मतभेद विसरून सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.
याच पार्श्वभूमीवर १८ जुलै रोजी कोल्हापूर ते पंढरपूर 'सद्बुद्धी दिंडी' काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सरकारला सद्बुद्धी मिळावी आणि शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी ही दिंडी काढण्यात येणार असून, आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी शिदोरी घेऊन यावे, असेही त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांनी विद्यार्थी आंदोलनाचाही मुद्दा उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. "२० दिवसांहून अधिक काळ विद्यार्थी आंदोलन सुरू आहे, तरी एकही जबाबदार अधिकारी किंवा मंत्री विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी गेलेला नाही," अशी टीका त्यांनी केली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी धावून जाणारे नेते आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेवर टीका करत, त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. "धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; अन्यथा पंतप्रधानांनीच याची जबाबदारी स्वीकारावी," असा इशाराही त्यांनी दिला.
शक्तीपीठ महामार्गामुळे शेती, पर्यावरण आणि पूरस्थितीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत, हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने संवाद साधून शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
Kolhapur News | Shaktipeeth Highway | Raju Shetti | Student Protest
|