बातम्या
सागर बगाडे यांच्या कलेला महाराष्ट्रभर व्यासपीठ; चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन
By Administrator - 11/23/2026 11:00:23 AM
Share This News:
राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक सागर बगाडे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात; महाराष्ट्रभर कला प्रसारासाठी प्रवास खर्चाची जबाबदारी स्वीकारणार
कोल्हापूर :
राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक सागर बगाडे यांच्या कलेला महाराष्ट्रभर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून, त्यांच्या कला प्रसारासाठी महाराष्ट्रभर होणाऱ्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पक्षाच्या वतीने उचलण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. सागर बगाडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
आमदार कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्तरप्रेमी मंचच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, विनोदकुमार लोहिया, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राहुल चिकोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सागर बगाडे यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सागर बगाडे यांनी आपल्यातील कला केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तिचे जतन, संवर्धन आणि महाराष्ट्रभर प्रचार-प्रसार करावा. आपल्या कलेच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा द्यावी. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातून देशाच्या विकासात योगदान देणे आवश्यक आहे. सागर बगाडे यांच्या या पुढील वाटचालीला आवश्यक पाठबळ देण्यासाठी त्यांच्या महाराष्ट्रभर होणाऱ्या प्रवासाचा खर्च पक्षाच्या वतीने उचलण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी प्रास्ताविकात सागर बगाडे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, सागर बगाडे हे केवळ आदर्श शिक्षक नसून शिक्षणाच्या पलीकडे जाऊन समाजाशी नाळ जोडणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात आनंद आणि सकारात्मकता निर्माण केली आहे. चंद्रकांतदादा पाटील यांचे सर्वसामान्यांशी असलेले माणुसकीचे नाते आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करण्याची भूमिका प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खासदार धनंजय महाडिक यांनीही सागर बगाडे यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. जन्माष्टमी फुगडी स्पर्धा, दहीहंडी, चित्रकला स्पर्धा, बी न्यूज यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. युवाशक्तीला विधायक दिशा देत सांस्कृतिक चैतन्य निर्माण करण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सागर बगाडे यांनी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष आणि जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. "मी शून्यातून प्रवास केला आहे. आज माझ्याकडे जे काही आहे, त्यामागे मला घडविणाऱ्या माणसांचे आशीर्वाद आणि प्रेम आहे. ज्यांनी मला घडवले, तीच माझी खरी संपत्ती आहे आणि विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी आहे," अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने आपल्यातील कलागुणांना विकसित होण्यासाठी योग्य वातावरण आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्या शुभांगीताई गावडे आणि डॉ. श्रुती जोशी यांच्या प्रेम, मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आपली जडणघडण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार कौस्तुभ गावडे यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांनी आभार मानले.
या सोहळ्यातून सेवापूर्ती म्हणजे केवळ शासकीय सेवाप्रवासाचा समारोप नसून समाजासाठी नव्या जोमाने कार्य करण्याची सुरुवात असल्याचा संदेश देण्यात आला. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करताना कला, संस्कृती आणि समाजसेवेचीही जोपासना करणाऱ्या सागर बगाडे यांच्या पुढील वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सागर बगाडे यांच्या कलेला महाराष्ट्रभर व्यासपीठ; चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन
|