राजकीय

शिरोळ तालुक्यात जमीन-पाणी वाचवण्यासाठी सैनिक टाकळीत बेमुदत उपोषण सुरू

sainik takali midc protest land water save farmers protest


By Administrator - 9/7/2026 1:52:36 PM
Share This News:



सैनिक टाकळी | प्रतिनिधी :

शिरोळ तालुक्यातील जमीन, पाणी आणि स्थानिक अस्मिता वाचवण्यासाठी सैनिक टाकळी येथे ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरुवार, ९ जुलै रोजी अमर जवान हुतात्मा स्मारकासमोर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा, तसेच गायरान जमीन गावाच्या विकासासाठी राखीव ठेवावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. प्रस्तावित एमआयडीसीऐवजी परिसरात सैनिक स्कूल, सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि केंद्रीय विद्यालय उभारण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

यासोबतच नियोजित इचलकरंजी राधाकृष्ण पाणी योजनेलाही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. दानवाड संगमावरून शिरोळ तालुक्याच्या हक्काचे पाणी नेऊ नये, तसेच इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

"सैनिक वाचवा! शेतकरी वाचवा!" आणि "जय जवान! जय किसान!" अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. हे आंदोलन कोणत्याही पक्ष, जात किंवा धर्माच्या पलीकडे जाऊन तालुक्याच्या अस्तित्वासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, विनोद पाटील आणि माजी सैनिक रिटायर्ड ऑ. कॅप्टन विजय गायकवाड यांच्यासह माजी सैनिक व ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

माजी सैनिक सुभेदार डॉ. सिद्धू पाटील, शामराव पाटील पोस्टमास्तर, रिटायर्ड ऑ. कॅप्टन अनिल पाटील, रिटायर्ड ऑ. कॅप्टन कृष्णा पाटील यांच्यासह अनेक नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संयोजकांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.


सैनिक टाकळीत MIDC विरोधात बेमुदत उपोषण जमीन पाणी वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार
Total Views: 12