राजकीय
सौंदत्ती यात्रेसाठी जादा एसटी बसेस सोडण्याची शिवसेनेची मागणी
By Administrator - 11/26/2026 3:15:50 PM
Share This News:
सौंदत्ती यात्रेसाठी जादा एसटी बसेस सोडा; चालक-मेकॅनिकची कार्यशाळा घ्या, शिवसेनेची मागणी
कागल| प्रतिनिधी : अजित बोडके
कर्नाटकातील सौंदत्ती येथे १९ ते २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या वार्षिक यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जादा एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच यात्रेपूर्वी चालक आणि मेकॅनिक यांची विशेष कार्यशाळा घेऊन बसेसची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे १० ते १५ हजार भाविक एसटी बसने सौंदत्ती यात्रेसाठी जातात. मात्र, यापूर्वीच्या यात्रांमध्ये प्रवासादरम्यान बसेसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होणे, टायर फुटणे अशा घटना घडल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. यंदा अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी परिवहन महामंडळाने आधीच खबरदारी घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या महिला उपशहरप्रमुख दिपाली आकाश शिंदे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. यात्रेच्या कालावधीत भाविकांना उत्तम प्रवासी सुविधा मिळाव्यात, तसेच कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
यात्रेपूर्वी सर्व चालक आणि मेकॅनिक यांची विशेष कार्यशाळा आयोजित करून यात्रेसाठी धावणाऱ्या बसेसची सखोल तांत्रिक तपासणी करावी. तसेच भाविकांचे सामान ठेवण्यासाठी कॅरिअरची सुविधा असलेल्या मोठ्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सौंदत्ती येथील डोंगर परिसरात यात्रेच्या तीनही दिवसांत वसुंधरा पथक कार्यरत ठेवावे, अशी सूचना निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवसेना महिला उपशहरप्रमुख दिपाली आकाश शिंदे, शहरप्रमुख विशाल देवकुळे, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, दीपक गोंड, बाबा शिरे, दिलीप कुंभार आणि शैलेंद्र साळुंखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सौंदत्ती यात्रेसाठी जादा एसटी बसेस सोडण्याची शिवसेनेची मागणी
|