मनोरंजन

सविता मालपेकर यांची लालबागच्या राजाबद्दल खास आठवण; म्हणाल्या, ‘फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं’

savita malpekar lalbaugcha raja old memories ganesh galli


By Shivani - 9/25/2026 4:42:18 PM
Share This News:



सविता मालपेकर यांच्या आठवणींमुळे ‘लालबागचा राजा’ चर्चेत; म्हणाल्या, “तेव्हा फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं…”

मुंबई :

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ आणि गुणी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘काकस्पर्श’, ‘गाढवाचं लग्न’ यांसारख्या गाजलेल्या कलाकृतींमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशातच सविता मालपेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लालबाग आणि गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

सविता मालपेकर या ‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशगल्लीतील गणपतीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. याच मंडपात बसून त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपलं बालपण, आजोळ आणि लालबाग-काळाचौकीतील गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी सांगितल्या.

‘काळाचौकी हे माझं आजोळ…’

सविता मालपेकर यांनी सांगितलं की, काळाचौकीतील सिताबाईची चाळ येथे त्यांचे मामा राहत होते आणि तेच त्यांचं आजोळ होतं. त्यांच्या आजोबांची मुंबईत सोन्या-चांदीची पेढी होती. त्यामुळे लहानपणी आईसोबत मुंबईत आल्यावर याच परिसरातून त्यांचा नेहमी प्रवास व्हायचा.

“काळाचौकीला सिताबाईची चाळ होती, तिथे माझा मामा राहायचा, माझं आजोळ ते... माझ्या आजोबांची सोन्या-चांदीची पेढी होती. त्यामुळे मुंबईत लहानपणापासून जेव्हा आई घेऊन यायची, तेव्हा इथेच घेऊन यायची. हा आमचा रोजचाच रस्ता होता,” अशी आठवण सविता मालपेकर यांनी सांगितली.

‘लालबागच्या राजाला फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं!’

जुन्या काळातील गणेशोत्सवाच्या आठवणी सांगताना सविता मालपेकर यांनी लालबागच्या राजाच्या मंडपातील त्यावेळच्या वातावरणाचा विशेष उल्लेख केला. आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी त्याकाळी आजच्यासारखी गर्दी नसायची, असं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “आताचा जो लालबागचा मोठ्ठा राजा आहे... नमस्कार करायचा, तिथे फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं.”

गणेशगल्लीला मात्र तेव्हाही असायची गर्दी

सविता मालपेकर यांनी पुढे सांगितलं की, लालबागच्या राजाच्या तुलनेत गणेशगल्लीमध्ये त्याकाळीही मोठी गर्दी असायची. मंडळाचे देखावे, विविध आकर्षणे आणि उंच गणपतीची परंपरा यामुळे गणेशगल्लीला विशेष महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं.“गणेशगल्लीला मात्र इतकी गर्दी असायची. म्हणजे तेव्हाही गर्दी असायची. इथे दिसणारी गर्दी आताची नाही, त्या काळातही इथे गर्दी असायची. कारण देखावा, बाकीच्या गोष्टी आणि उंच गणपती...” असं सविता मालपेकर यांनी म्हटलं. तसंच वेलिंग मास्तरांनी पहिला उंच गणपती केला तो याच ठिकाणी, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

तीन दशकांहून अधिक काळ अभिनयाचा ठसा

सविता मालपेकर यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘काकस्पर्श’मधील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. रंगभूमीवरील ‘गाढवाचं लग्न’ या लोकप्रिय नाटकातील त्यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

मात्र, अभिनयासोबतच मुंबईतील बालपणीच्या आठवणी आणि गणेशोत्सवाशी असलेलं त्यांचं नातं त्यांच्या या मुलाखतीतून पुन्हा समोर आलं आहे. लालबागच्या राजाच्या बदललेल्या वैभवाबद्दल त्यांनी सांगितलेल्या आठवणी सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत.


सविता मालपेकर यांची लालबागच्या राजाबद्दल खास आठवण; म्हणाल्या, ‘फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं’
Total Views: 11