बातम्या
शक्तीपीठ महामार्गाचे रात्री ड्रोन मॅपिंग? भुदरगडमधील शेतकरी संतप्त
By Administrator - 11/27/2026 5:19:58 PM
Share This News:
शक्तीपीठ महामार्गाचे रात्री बारानंतर ड्रोनद्वारे मॅपिंग? भुदरगडमधील शेतकऱ्यांचा संताप
कोल्हापूर :
शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगला दिवसा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना आता भुदरगड तालुक्यात रात्री बारानंतर ड्रोनद्वारे शेतशिवाराचे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. म्हसवे, दारवाड, निळपण, कोनवडे आणि नाधवडे परिसरात गेल्या दोन रात्री शेतजमिनींवर ड्रोन फिरताना दिसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी विरोध करून मॅपिंगचे काम बंद पाडले होते. मात्र, आता रात्रीच्या अंधारात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ड्रोन सर्वेक्षण कोणत्या विभागाच्या आदेशाने सुरू आहे? त्यासाठी परवानगी घेतली आहे का? तसेच कोणत्या उद्देशाने माहिती संकलित केली जात आहे? असे सवाल उपस्थित करत जिल्हा प्रशासनाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दिवसा विरोध, मग रात्रीच्या अंधारात मॅपिंग कशासाठी? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती आणि उदरनिर्वाह धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
भुदरगडमधील या कथित रात्रीच्या ड्रोन सर्वेक्षणाबाबत प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे रात्री ड्रोन मॅपिंग? भुदरगडमधील शेतकरी संतप्त
|