राजकीय

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; आजरा तहसीलवर मोर्चा

shaktipeeth highway protest ajra peranoli farmers meeting


By Administrator - 11/27/2026 4:37:52 PM
Share This News:



शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; पेरणोलीत बैठक, आजरा तहसीलवर मोर्चा काढण्याचा निर्णय

आजरा : प्रतिनिधी हसन तकीलदार

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आजरा तालुक्यातील पेरणोली येथे बाधित शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींची बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवत येत्या आठवड्यात आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानावरही मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा तीव्र करणार

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात तालुक्यातील बाधित गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे आणि आंदोलनासाठी पुन्हा एकदा सज्ज होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

'शक्तिपीठ' असे आकर्षक नाव देऊन जनतेच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. या महामार्गाची मागणी कोणत्याही शेतकऱ्याने केलेली नसताना सरकार भांडवलदार आणि मोठ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प राबवत असल्याची टीका उपस्थितांनी केली.

सुपीक शेती आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी संघर्ष

शक्तिपीठ महामार्गासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध असतानाही या महामार्गाचा आग्रह कशासाठी धरला जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या प्रकल्पामुळे सुपीक शेती, स्थानिक पर्यावरण, लोकाभिमुख संस्कृती, जंगले आणि दुर्मिळ वनसंपत्तीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

शेती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना एकत्र करून आंदोलन व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला.

शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींची उपस्थिती

या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, कॉ. संपत देसाई, पत्रकार कृष्णा सावंत, सर्जेराव देसाई, निवृत्ती फगरे, दिनेश कांबळे, जालिंदर कांबळे, पांडुरंग देसाई, ज्ञानदेव ढोकरे, प्रल्हाद देसाई, पांडुरंग गुरव, शिवराम गुरव, यशोदा हळवणकर, छाया गुरव, अनुसया गुरव, मारुती फगरे, फिलिप लोबो, सुभाष देसाई यांच्यासह महामार्गबाधित शेतकरी, महिला आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; आजरा तहसीलवर मोर्चा
Total Views: 12