बातम्या
शरद कोराणे मृत्यू प्रकरण; रविकिरण इंगवलेवर गुन्हा दाखल करण्याची कोराणे कुटुंबीयांची मागणी
By Shivani - 1/10/2026 4:52:55 PM
Share This News:
शरद कोराणे मृत्यू प्रकरणी रविकिरण इंगवलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी
कोल्हापूर :
दिवंगत शरद कोराणे यांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप करत त्यांच्या पत्नी पूजा शरद कोराणे यांनी रविकिरण इंगवले यांच्यावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये शरद कोराणे यांना एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन मारल्याची कबुली दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पूजा कोराणे यांनी २७ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात पतीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शरद कोराणे यांचा ११ जुलै २०२३ रोजी मृत्यू झाला. त्यापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३६/२०१९ अन्वये त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ मे २०१९ रोजी अटकेनंतर ते कारागृहात होते.
कारागृहात असताना शरद कोराणे यांची प्रकृती वारंवार बिघडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास झाला होता. तसेच पायाच्या अंगठ्याला गँगरीन झाल्याने तो काढावा लागला होता. त्यांच्यावर कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये अनेक महिने उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ११ जुलै २०२३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
पूजा कोराणे यांच्या तक्रारीनुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती शरद कोराणे यांना एचआयव्हीचे इंजेक्शन देण्यास आपण सांगितल्याचे आणि त्यातून त्यांचा मृत्यू झाल्याचे कथित विधान करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या ऑडिओ क्लिपमधील आवाज रविकिरण इंगवले यांचा असल्याची आपली खात्री असल्याचे पूजा कोराणे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच कोराणे कुटुंब आणि रविकिरण इंगवले यांच्यात गेल्या २५ ते ३० वर्षांपासून राजकीय तसेच वैयक्तिक वैर असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
ऑडिओची न्यायवैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी
व्हायरल ऑडिओ क्लिपची तांत्रिक आणि न्यायवैज्ञानिक तपासणी करावी, आवाजाची सत्यता पडताळावी आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवावेत, अशी मागणी कोराणे कुटुंबीयांनी केली आहे.
शरद कोराणे यांना कथितरीत्या एचआयव्हीचे इंजेक्शन कोणी दिले? त्यासाठी कोणाला प्रवृत्त करण्यात आले होते का? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच कथित कटकारस्थानामागे नेमके कोण होते, याचा तपास करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आरोपांची स्वतंत्र पडताळणी अद्याप बाकी
दरम्यान, व्हायरल ऑडिओ क्लिपमधील कथित विधानांची स्वतंत्र पडताळणी झाल्याची किंवा या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे निवेदनातील आरोप आणि त्यांची सत्यता तपासातून सिद्ध होणे या स्वतंत्र बाबी आहेत. ऑडिओ क्लिपची सत्यता, त्यातील आवाज कोणाचा आहे आणि त्याचा शरद कोराणे यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पतीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी पूजा कोराणे यांनी केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेविका अर्चना कोराणे, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.
शरद कोराणे मृत्यू प्रकरण; रविकिरण इंगवलेवर गुन्हा दाखल करण्याची कोराणे कुटुंबीयांची मागणी
|