बातम्या

शिरढोण ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उपोषणाचा इशारा

shirdhon gram panchayat financial irregularities protest


By Administrator - 11/25/2026 12:27:37 PM
Share This News:



शिरढोण ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण तापले; कारवाईसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण

चौकशी अहवाल सादर होऊनही सात ते आठ महिन्यांपासून कारवाई रखडल्याचा आरोप; सातगोंडा उर्फ पोपट पुजारी यांचा आंदोलनाचा इशारा

 शिरढोण (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाचा निधी, घरफाळा व पाणीपट्टी वसुली तसेच खर्चातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले असतानाही गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून वसूलपात्र रक्कम तातडीने वसूल करावी, या मागणीसाठी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सातगोंडा उर्फ पोपट पुजारी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या मागणीसाठी सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्यांची पूर्तता न झाल्यास ७ डिसेंबरपासून शिरढोण येथील शिवाजी चौकात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा पुजारी यांनी दिला आहे.

शिरढोण ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत अविनाश रामगोंडा पाटील, सातगोंडा उर्फ पोपट पुजारी यांच्यासह १७ ग्रामस्थांनी डिसेंबर २०२५ मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पंचायत समिती शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने चौकशी करून ४ मे आणि २२ जून २०२६ रोजीचे अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत.

मात्र, चौकशी अहवाल प्राप्त होऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने तक्रारदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप पुजारी यांनी केला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिल्यानंतरही कारवाई पुढे सरकलेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चौकशी अहवाल कोणाच्या दप्तरात अडकले आहेत आणि कारवाईला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पुजारी यांनी दिला आहे.


शिरढोण ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उपोषणाचा इशारा
Total Views: 108